वाहतुक नियमांबाबत शालेय विद्यार्थी व कॉर्पोरेट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती  

नवी मुंबई : कोपरखैरणे वाहतुक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच कॉर्पोरेट ऑफिस मधील स्टाफ, चालक व इतरांसांठी वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वाहतुकीचे नियम कसे पाळले पाहिजेत यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.  

वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने भारतामध्ये दरवर्षी मोटर अपघातात दीड लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात तर काही कायमचे जखमी होतात. त्यामुळे वाहतूक विभागामार्फत दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान या उपक्रमाअंतर्गत शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी, नागरिक तसेच वाहन चालकांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती व्हावी याकरिता विविध उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत कोपरखैरणे वाहतुक शाखेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी कोपरखैरणेतील यशवंतराव चव्हाण इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

यावेळी कोपरखैरणे वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत व आपल्या पालकांना त्याबाबत कसे समजावून सांगावेत याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाप्रमाणेच कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने रिलायन्स जिओ येथील ऑफिस स्टाफ, चालक व इतर स्टाफसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त तिरुपती काकडे यांनी वाहतुकीचे नियम कसे पाळले पाहिजेत यावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात सुमारे 350 अधिक नागरिक सहभागी झाले होते.  

यादरम्यान, कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वेगवेगळ्या भागात विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱया सुमारे 350 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने बालाजी गार्डन, फाम सोसायटी, कलश उद्यान, रिलायन्स मार्ट कडून एपीएमसी कडे जाणाऱ्या रोडवर वाहतुकीचे नियम मोडणाऱया वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान देखील वाहन चालकांमध्ये प्रबोधन करुन वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ‘निर्णय तुमचाच जबाबदारीही तुमचीच'