ढिसाळ नियोजनामुळे ‘सॅटीस'च्या कामाला कासवगती
कल्याण : कल्याण पश्चिम परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु असलेले ‘सॅटीस'चे काम ढिसाळ नियोजनामुळे संथगतीने सुरु आहे. स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली महापालिका, रेल्वे, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन, आरटीओ यांचा एकमेकांशी समन्यव्य नाही. परिणामताः स्टेशन परिसरात आणि प्रमुख चौकात नित्यरोज प्रचंड वाहतूक काेंडी आणि वाहतुक व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडालेला आहे.
‘सॅटीस'चे काम सुरु असताना वाहतूक पोलिसांनी परिपत्रक जारी करुन वाहतूक व्यवस्थेत बदल केले. पंरतु, प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसत नाही. उपाययोजना अभावी संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. ‘सॅटीस'चे काम सुरु असताना एसटी महामंडळाचा बस डेपो वि्ीलवाडी येथे स्थलांतरीत करण्यात आला होता. पंरतु, एसटी महामंडळाच्या बसेस रेल्वे स्टेशन परिसरातील बस स्थानक आणि ‘सॅटीस'चे काम पूर्ण होईपर्यंत प्रेम आँटो, दुर्गाडी चौक, एपीएमसी मार्केट बायबास मार्गे आणि शहराच्या बाहेर तात्पुरते बसथांबे आवश्यक होते.
बसडेपो वि्ीलवाडी येथे स्थलांतरीत करुनही बाहेर गावच्या सर्वच बसेस एकेरी मार्गाने स्टेशन परिसरात येतात. त्यामुळे एकेरी वाहतूक मार्गावर प्रचंड ताण येऊन सदर भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होत आहे. ‘सॅटीस'चे काम सुरु आहे, त्या परिसरात आणि दिपक हॉटेल ते शिवाजी चौक, महात्मा फुले चौक, साधना हॉटेल, भानुसागर रोड बैलबाजार या वाहतुकीच्या रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, इतर वस्तू विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. यामुळे देखील रहदारीला अडथळे येत आहेत.
एसटी स्टॅण्ड समोरील कल्याण पश्चिम ते कल्याण पूर्व असा रेल्वे हद्दीतील ३० वर्ष जुना रिक्षा स्टॅण्ड कोरोना काळात ‘रेल्वे'ने तडकाफडकी कायमस्वरुपी बंद केला. ‘रेल्वे'ने आणि महापालिकेने रिक्षा स्टॅण्डसाठी पर्यायी जागा दिलेली नाही. त्यामुळे सर्व रिक्षा वाहतूक एसटी स्टॅण्ड समोरील रस्त्यावर आली.
काही महिन्यांपूर्वी एसटी स्टॅण्ड समोरील रहदारीचा रस्ता सॅटीस कामाकरिता बंद करण्यात आला. येथील सर्व रिक्षा वाहतूक साधना हॉटेल येथील अंत्यत वर्दळीच्या रस्तयावर आली. रस्ता बंद करायच्या आधी ‘रिक्षा संघटनां'नी पर्यायी रिक्षा वाहतूक स्टॅण्ड करीता २-३ ठिकाणी रेल्वे आणि महापालिका हद्दीतील जागा सुचवून रिक्षांची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. पंरतु, रेल्वे आणि महापालिका प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.
कल्याण-डोबिंवली महापालिका आयुक्तांनी स्टेशन परिसरात पाहणी करुन स्मार्ट सिटी, रेल्वे महापालिका, आरटीओ, वाहतूक पोलीस, पोलीस प्रशासन यांची संयुवत बैठक आयोजित करुन स्टेशन परिसरात संथगतीने सुरु असलेल्या सॅटीस कामाची गती वाढवावी. रिक्षा वाहतूक आणि इतर वाहतुकीचे नियोजन करावे. वाहतुक काेंडी आणि स्टेशन परिसरातील बेशिस्त वाहतुकीसंदर्भातील तक्रारींबाबत लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष उदासिन आहेत. यामुळे प्रवासी नागरिकांच्या नाराजीचा फटका लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना सहन करावा लागेल, अशी चर्चा रंगली आहे.