महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
‘शासन आपल्या दारी' उपक्रमाचा दिघा येथे प्रारंभ
नवी मुंबई : ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी' असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना थेट लोकांपर्यंत पोहोचवून त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना गतीमानतेने देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात सुरु असलेल्या ‘शासन आपल्या दारी' उपक्रमाचा नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील शुभारंभ दिघा तलावानजिकच्या पटांगणात नागरिकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाला.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्या दारी' अभियानाचे अतिशय उत्तम नियोजन २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी पर्यंत २८ ठिकाणी करण्यात आले असून दिघा ते बेलापूर या महापालिका क्षेत्रात दररोज सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात सदर उपक्रम संपन्न होणार आहे.
‘शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या दिघा येथील शुभारंभप्रसंगी मनोगत व्यक्त करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी शासकीय कार्यालयात जाऊन योजनांचा लाभ घेण्यात नागरिकांना जाणवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि नागरिकांना अगदी त्यांच्या घराजवळ योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सदर उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. आपल्या दारापर्यंत लोककल्याणकारी योजना घेऊन येणारा सदर उपक्रम अत्यंत लाभदायी असल्याचे सांगत त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, परिमंडळ-२ चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, ‘मुख्यमंत्री जनकल्याण योजना'चे शासकीय अधिकारी सुनील आव्हाड, दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, वैद्यकिय अधिकारी डॉ. उज्वला ओतुरकर, ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक अहिरे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे तसेच माजी नगरसेवक नवीन गवते, ॲड. अपर्णा गवते, दिपा गवते, आदि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पहिल्याच दिवशी दिघा विभागातील सकाळच्या सत्रात ३०० तर दुपारच्या सत्रात ५५० हून अधिक नागरिकांनी ‘शासन आपल्या दारी' उपक्रमाचा लाभ घ्ोतला. काही जणांनी शासनाच्या आणि महापालिकेच्या योजनांची माहिती करुन घेत योजनांचे अर्ज भरुन त्यांचा लाभही घेतला.
दिघा विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड यांच्यासह सर्व उपस्थितांनी माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पर्यावरण संरक्षण-संवर्धनाची सामुहिक शपथ ग्रहण केली आणि आभार प्रदर्शन केले.
यापुढील ‘शासन आपल्या दारी' उपक्रम ऐरोली विभागात २३ जानेवारी रोजी, सकाळी ११ ते १ या वेळेत ऐरोली विभाग कार्यालय तसेच दुपारी २ ते ५ या वेळेत महापालिका शाळा क्रमांक-५३, चिंचपाडा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे २४ जानेवारी रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत शाळा क्रमांक-४८, दिवा, ऐरोली (काचेची शाळा) येथे तर दुपारी २ ते ५ या वेळेत ऐरोली, सेक्टर-१५ मधील आर. आर. पाटील मैदान येथे होणार आहे. या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.