चिरनेर येथे श्री जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा
उरण ः लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिरनेर मधील ‘श्री महागणपती' मंदिरात माघी गणेशोत्सवाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात श्री गणेश जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी ‘श्रीं'च्या दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. उध्दवबुवा जावडेकर पुणे यांचे सुश्राव्य किर्तन, प्रवचन सोहळ्याचे आयोजन तसेच यशस्वी उद्योजक सागर राजाशेठ खारपाटील यांच्या हस्ते सकाळी ‘श्रीं'च्या अभिषेक सोहळ्याचे आयोजन ‘श्री गणपती देवस्थान चिरनेर'च्या वतीने करण्यात आले होते.
गणपती ज्ञान देवता म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात गणेशाची अनेक पुरातन जागृत देवस्थाने आहेत. त्यापैकीच एक पुरातन जागृत देवस्थान उरण तालुवयातीळ चिरनेर या ऐतिहासिक गावात आहे. चिरनेर गाव निसर्ग संपन्नतेची देणगी लाभलेले सुंदर गाव आहे. पूर्वीच्या काळी मुख्य बाजारपेठ असणारे चिरनेर गाव इंग्रज राजसत्तेविरुध्द लढल्या गेलेल्या १९३० सालच्या ‘जंगल सत्याग्रह'च्या लढ्याने भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात प्रसिध्द पावले आहे. मात्र, ‘चिरनेर'ची खरी ओळख आहे ती पुरातन, जागृत अशा महागणपती देवस्थानामुळे चिरनेर गावात असणारे अत्यंत प्राचीन महागणपती देवस्थान आता गणेशभक्तांची पंढरी झाली आहे.