नवी मुंबई पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
कोपरी गावात खुलेआम अमंली पदार्थांची विक्री?
वाशी : नवी मुंबई शहरातील कोपरी गाव मधील साईबाबा मंदिर परिसरात एका घरातून खुलेआम अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे एपीएमसी पोलीस ठाणे मधील पोलीस कर्मचाऱ्यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे. कोपरी गावात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांची संख्या वाढत असून, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे कोपरी गावात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता कोपरी गावातील नागरिकांकडून जोर धरु लागली आहे.
पुणे शहरानंतर शिक्षण नगरी आणि आयटी हब म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र, नवी मुंबई शहरात सध्या वाढत्या अंमली पदार्थ विक्रीमुळे नवी मुंबई शहराची ओळख आता ड्रग्ज सिटी अशी होत चालली आहे का?, असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नवी मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री होत आहे. अंमली पदार्थांच्या आहारी आता शाळकरी मुले देखील जात असून, शाळेच्या आवारात देखील अंमली पदार्थांनी शिरकाव केल्याची कुरबुर सुरु आहे. वाशी मधील कोपरी गावातील साईबाबा मंदिर परिसरात एका घरातून खुलेआम अंमली पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे कोपरी गावात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या गदर्ुल्ल्यांची संख्या वाढत असून, चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत मागील महिन्यात कोपरी गावात ‘पोलीस आपल्या दारी' उप्रकमात स्थानिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे एपीएमसी पोलीस ठाणे मधील पोलीस कर्मचाऱ्यांचे ‘अर्थपूर्ण दुर्लक्ष' होत असल्याने परिस्थिती ‘जैसे थे' आहे. त्यामुळे कोपरी गावात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी कोपरी गावातील नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) विवेक पानसरे यांना कारवाई बाबत विचारले असता, त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना भेटण्याचा सल्ला दिला.
राज्य विधिमंडळ अधिवेशनात अंमली पदार्थांच्या विरोधात उमटले पडसाद
सध्या अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन करण्याचे प्रकार वाढत आहेत. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे युवा पिढीमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण वाढत आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी राज्य विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडून कारवाई बाबत विचारणा केली. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील कारवाईची मागणी केली. यावर, अंमली पदार्थ तस्करी आणि अवैध कामांविरोधात कारवाई केली जाईल. त्याचबरोबर प्रशासनातील जे अधिकारी या अवैध कामधंद्यामध्ये सहभागी असतील त्यांना बडतर्फ केले जाईल, असे उत्तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर नवी मुंबई पोलीस अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कशी कारवाई करतात?, ते पुढील काळात स्पष्ट होणार आहे.
--