अर्थसंकल्पाची अंमलबजावणी त्वरित करण्याची मागणी

ठाणे : सन २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि जनहितवादी असून सादर केलेल्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) द्वारे करण्यात आली. तर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे आभारही यावेळी प्रगत करण्यात आले. शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मिनाक्षी शिंदे, शिवसेना ठाणे शहर विधानसभा संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाखाडी शहरप्रमुख राम रेपाळे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, आदिंनी आयुक्तांची भेट घेवून त्यांचे अभिनंदन केले.

राज्याच्या स्तरावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी  शासनस्तरावर महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. त्याच पध्दतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी देखील लोकहित साधणारा सन २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. ठाणे शहराच्या हिताच्या आणि विकासाच्या सर्वांगिण दृष्टीने अनेक योजना तसेच विकासाची कामे यामध्ये घेतली आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासामध्ये ५० टक्के सवलत उपलब्ध करुन दिली, त्याच धर्तीवर आयुवतांनी ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये महिलांना ५० टक्के सवलत उपलब्ध करून दिली असून याचा निश्चितच फायदा महिलांना होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना यापूर्वी परिवहन सेवेकडून वय ७५ वर्षे पूर्ण  झालेल्या नागरिकांना परिवहन सेवेचा प्रवास मोफत करता येत होता. परंतु, आता वय ६० वर्षे अशी वयाची मर्यादा केलेली असल्याने ६० वर्षावरील सर्व नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार आहे. महापालिका रुग्णालय आणि प्रसुतीगृहांमध्ये प्रसुत होणाऱ्या मातांना मुख्यमंत्री मातृत्व भेट म्हणून किट देण्याचे जाहीर केले होते, ज्याचा उपयोग मातेला स्वतःची आणि नवजात शिशूची काळजी घेण्यासाठी होणार आहे, त्याचाही लाभ ठाणे शहरातील महिलांना होणार आहे. सर्वसाधारण महिलांना स्वयंरोजगार निर्माण करुन त्यांचे सक्षमीकरण आणि जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीकोनातून महिलांच्या स्वयंरोजगारासाठी या आर्थिक वर्षातही धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजनेसाठी तरतूद प्रस्तावित करण्यात आली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांना नमूद केले आहे.

 महिला बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यास उत्तेजन देण्यासाठी महापालिकेच्या समन्वय बँकाकडून कर्ज उपलब्ध करुन देणे, बँकेकडून कर्ज घेतल्यास नियमित कर्ज फेडणाऱ्या बचत गटांना व्याजाच्या स्वरुपात सबसिडी देणे या बाबींचा देखील समावेश केला आहे. सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पात महिला बचत गटांना शून्य व्याज दराने कर्ज योजना या लेखाशीर्षांतर्गत १ कोटी तरतूद प्रस्तावित केल्याबद्दल, अशा विविध सुविधांचा समावेश जनहिताच्या दृष्टीने अर्थसंकल्पात समाविष्ट केल्याने ‘शिवसेना'तर्फे आयुक्त अभिजीत बांगर यांचे आभार व्यक्त करण्यात आले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 रुफ टॉप सोलर बसवा, मोफत वीज मिळवा