पीक विमा योजनेचा लाभ केवळ एक रुपयात

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाने यंदाच्या खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पीक विमा योजना लागू केली असून, शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन या योजनेत सहभागी होता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ असून, ई-पीक पाहणीद्वारे नोंदविलेले पीक अंतिम पीक म्हणून गृहीत धरण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन कोकण विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी कृषि विभागामार्फत प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना पेरणी न होणे तसेच पूर, दुष्काळ, पावसातील खंड यामुळे होणारे नुकसान, गारपीट, भूस्खलन, क्षेत्र जलमय होणे, वीज कोसळणे, ढगफुटी अशा स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि काढणीनंतर शेतात सुकवणीसाठी ठेवलेल्या पिकांचे होणारे नुकसान या सर्व बाबींकरीता विमा संरक्षण लाभणार आहे, अशी माहिती अंकुश माने यांनी दिली.

खरीप हंगामामध्ये कोकण विभागामधील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात भात, नाचणी आणि उडिद या पिकांकरीता पीक विमा उतरविता येणार आहे. शेतकरी हिस्स्याची विमा हप्त्याची रक्कम १ रुपये वजा जाता उर्वरित रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. पीक विमा योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी न होण्याचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या मुदतीच्या सात दिवस आधी बँकेत सादर करावे लागणार आहे. घोषणापत्र दिलेल्या शेतकऱ्यांना योजनेच्या सहभागातून वगळण्यात येणार आहे, असे अंकुश माने यांनी सांगितले.

कोकणातील भात पिकाकरीता अधिसूचित असलेल्या ३०७ महसूल मंडळांमध्ये, नाचणी पिकाकरीता अधिसूचित २३३ महसूल मंडळांमध्ये आणि उडीद पिकाकरीता अधिसूचित ५ महसूल मंडळांमध्ये पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये नियुक्त युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तर, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये चोलामंडलम एम. एस. जनरल कंपनीमार्फत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ठाणे, पालघर, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पीकासाठी विमा संरक्षित रक्कम ५१ हजार ७६० (रुपये/हेक्टर) तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी ५० हजार (रुपये/हेक्टर) आहे. नाचणी पिकासाठी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पीक विमा संरक्षित रक्कम २० हजार (रुपये/हेक्टर) तर पालघर जिल्ह्यातील उडीद पिकासाठी पीक विमा संरक्षित रक्कम २५ हजार (रुपये/हेक्टर) इतकी आहे, असे अंकुश माने यांनी स्पष्ट केले.

पीक विमा योजनेची अंमलबजावणी करताना रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी, ड्रोन, स्मार्टफोन, डिजिटल माहिती आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन, नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येणार आहे. खरीप हंगाम पीक विमा योजना २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत ३१ जुलै २०२३ आहे. पीक विम्यासाठी अर्ज सादर करताना बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, आधारकार्ड, पेरणी घोषणापत्र, बँक खात्याची तपशील प्रत सोबत जोडणे आवश्यक आहे. पीक विमा पोर्टल, विमा कंपनी संकेतस्थळ, बँक, पीक विमा ॲप इत्यादी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होता येणार आहे, असे अंकुश माने यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरताना कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी कृषि विभागाकडून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा संरक्षणाचा लाभ मिळण्याकरीता पीक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभागीय कृषि सहसंचालक अंकुश माने यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जानेवारी ते आतापर्यंत ‘डेंग्यू'चे २८८ संशयित रुग्ण