मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
नवी मुंबई सुपर सब-ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धा संपन्न
नवी मुंबई : गोल क्वेस्ट फाऊंडेशन, नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे खेळ आणि खेळाडुंना प्रोत्साहन देऊन विविध खेळांतील होतकरु खेळाडुंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्य केले जात आहे. खास करुन सध्याच्या युगात लहान वयातील मुलांमध्ये मैदानी खेळ खेळण्याऐवजी मोबाईलवर गेम खेळण्याची जणू व्यसनच लागलेले आहे. यातून वेळीच बाहेर काढणे काळाची गरज बनलेली असून प्रत्येक पालक अत्यंत त्रस्त आणि चिंतीत आहेत.
गोल क्वेस्ट फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून प्रथमच नवी मुंबईमध्ये अगदी ६, ८,१०,१२ वर्षाआतील मुला-मुलींकरिता ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आजमितीस लहान वयोगटातील मुलांमध्ये खेळण्याकडे कल कमी होत असून ‘स्मार्ट फोन'वर खेळण्यामध्ये जास्त कल दिसून येत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक तज्ञ यावर चिंता व्यक्त करत असून यावर मात करण्यासाठी मुलांना मैदानावर आणणे अत्यंत गरजेचे आहे.
त्या अनुषंगाने लहान वयातील मुलांसाठी सीबीडी, सेवटर-३ मधील भारतरत्न स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल येथे ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यातआले होते. सदर स्पर्धेत १६०० हून अधिक मुला-मुलींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा शुभारंभ तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार विजेता आंतराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमास ‘बँक ऑफ इंडिया बेलापूर शाखा'चे वरिष्ठ व्यवस्थापक अलोककुमार, ‘महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन'चे उपाध्यक्ष धनंजय वनमाळी, पत्रकार नामदेव मोरे, नवी मुंबई महापालिका क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, ‘संस्था'चे ट्रस्टी किरण तावडे, सिध्दाराम दहिवडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना ऑलिम्पिक स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये ज्यांनी संपूर्ण जगभरात भारत देशाचे नावलौकीक केले अशा अर्जुन पुरस्कार प्राप्त उपायुवत ललिता बाबर, पोलीस निरीक्षक तथा राष्ट्रीय खेळाडू विष्णू परब, ट्रायडेंट लॅजिस्टीकचे मालक सुरेश सी. एस. राणा, महेश पटेल, शुटींगबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू सुनिल मोरे यांच्या शुभहस्ते विविध गटातील विजेत्या खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या स्पर्धेतील अंतीम जनरल चॅम्पियनशिप प्रथम- फादर ॲग्नल मल्टीपरपज स्कुल (वाशी), द्वितीय- अंजुमन इस्लाम स्कुल (वाशी), तृतीय- डॉन बॉस्को स्कुल (नेरुळ) या शाळांना चषक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.