‘कडोंमपा'चा कारभार ठेकेदार चालवतात का?

कल्याण : ठेकेदारांची माणसे महापालिका अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असून महापालिकेच्या फाईल ते हाताळत असल्याचा धक्कादायक प्रकार ‘मनसे'ने समोर आणाला आहे. यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेचा (कडोंमपा) कारभार ठेकेदार चालवतात का? असा सवाल ‘मनसे'ने उपस्थित केला आहे. तसेच संबंधित महापालिका कर्मचारी आणि ठेकेदाराच्या माणसांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

‘मनसे'चे विभाग प्रमुख कपिल पवार आणि शाखा प्रमुख गणेश लांडगे यांनी कडोंमपा आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडे याबाबत निवेदन दिले असून महापालिकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याचीी मागणी केली आहे. मार्च महिन्यात ‘मनसे'कडून महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यात होर्डिंग संदर्भात चर्चा करण्यात आली होती. परंतु, ‘कंडोमपा'च्या संबंधित विभागाकडून कुठलीही माहिती न मिळाल्यामुळे ‘मनसे'चे विभाग प्रमुख कपिल पवार यांनी माहितीचा अधिकार अंतर्गत मालमत्ता विभागात होर्डिंग संदर्भात माहिती मागितली होती.

याबाबत माहिती घेण्यासाठी पवार ३० मे रोजी मालमत्ता विभागात गेले असता वरिष्ठ सहाय्यक आयुक्त दिलीप सोनवणे यांनी त्यांच्या एका अधिकाऱ्यास माहिती देण्यास सांगितले. परंतु, सदर  अधिकाराने स्वतः माहिती न देता तेथे ठेकेदाराचा माणूस बसला होता त्याच्याकडून ती माहिती घेण्यास सांगितले. सदर बाब पवार यांच्या लक्षात आली असता मनसैनिकांनी तिथे विचारणा केल्यावर त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण झाला.

ठेकेदाराचा माणूस अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून माहिती कशी देऊ शकतो? ती खरी असेल की खोटी? मुंबईतील होर्डिंग दुर्घटना पाहता माहिती योग्य मिळणे गरजेचे होत. परंतु, संबंधीत व्यक्ती ठेकेदाराचा माणूस तिथे सहजपणे फाईल या टेबलवरुन दुसऱ्या टेबलवर करतो त्याला ते अधिकार कोणी दिले? महापालिका कंत्राटी नियमानुसार ठेकेदारांच्या माणसाला चालवायला दिली आहे का? असा सवाल कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच ६ महिन्यापूर्वी ठेकेदाराच्या माणसाकडून फाईल हाताळणे तसेच गहाळ करण्यासंदर्भात महापालिका कडून गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले.

एकूणच सदर प्रकरणाचा तपास व्हावा, येथील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कपिल पवार, गणेश लांडगे यांनी महापालिका आयुवतांकडे केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल  महापालिका तर्फे पीसीपीएनडीटी, एमटीपी कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळा