‘कोकण पदवीधर मतदारसंघ'मध्ये निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल
नवी मुंबई : ‘कोकण पदवीधर मतदारसंघ'मध्ये ‘भाजपा'च्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शवतीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा विश्वास डावखरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आमदार डावखरे यांच्या उमेदवारीला ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला असून, त्याचवेळी ‘मनसे'चे उमेदवार अभिजीत पानसे यांनी माघार घेतली आहे.
‘कोकण पदवीधर मतदारसंघ'मधील निवडणुकीसाठी आ. निरंजन डावखरे यांनी ७ जून रोजी कोकणभवन येथे सह-निवडणूक निर्णय अधिकारी अमोल यादव यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला-बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार गणेश नाईक, संजय केळकर, किसन कथोरे, सौ. मंदाताई म्हात्रे, प्रसाद लाड, कुमार आयलानी, ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, निलेश राणे, ‘राष्ट्रवादी'चे आमदार शेखर निकम, माजी आमदार डॉ. विनय नातू, संदीप नाईक, अनिकेत तटकरे, ‘भाजपा'चे विभागीय संघटन मंत्री हेमंत म्हात्रे आदिंसह ‘भाजपा'चे कोकणातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘भाजपा'चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल आमदार डावखरे यांनी आभार मानले. तसेच ‘मनसे'चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने पदवीधर मतदारसंघात पाठिंबा देऊन ‘मनसे'ची उमेदवारी मागे घेतली, याबद्दल डावखरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
कोकणामध्ये ना. रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वाखाली ‘कोकण पदवीधर मतदारसंघ'मधील निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त करतानाच या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होऊन ‘महायुती'च्या उमेदवारीबाबत मार्ग निघून ‘महायुती'ची एकत्रित ताकद दिसून येईल, असा विश्वासही आ. निरंजन डावखरे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, गेल्या १२ वर्षांत ‘कोकण'च्या सर्वोतोपरी विकासासाठी कार्य केले असून, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पदवीधर यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तसेच शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले.