खारघर मध्ये रग्बी फुटबॉल मैदान उभारण्याच्या स्वप्नाचा भंग

खारघर : खारघर मध्ये रग्बी फुटबॉल मैदानासाठी सिडको द्वारे जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. मात्र, सदर जागा खाडी किनारी असल्यामुळे  कांदळवन विभाग, वन विभाग यांचा अडथळा तसेच पर्यावरण प्रेमी आणि  लोकप्रतिनिधी यांच्या विरोधामुळे ‘इंडियन रग्बी फुटबॉल युनियन'ने सदर जागा ‘सिडको'ला परत केल्यामुळे खारघर मध्ये होणारे रग्बी मैदान बारगळले आहे.

      रग्बी खेळ जगातील पाश्चात्य देशांमध्ये खेळला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात भारतातील अनेक राज्यात रग्बी खेळ खेळला जात आहे. सर्वाधिक जिकरीचा आणि जिगरबाज खेळ म्हणून रग्बी फुटबॉल खेळ ओळखला जातो. रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र द्वारे महाराष्ट्रात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशीम, बिड, परभणी, नांदेड, औरंगाबाद, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पुणे, मुंबई उपनगर आणि मुंबई आदी अठावीस जिल्ह्यात ‘रग्बी खेळ' खेळला जातो. काही जिल्ह्यातील १४, १७ आणि १९ वर्षाखालील मुले आणि मुलींच्या राज्यस्तरीय रग्बी फुटबॉल स्पर्धा गाजवणाऱ्या उकृष्ठ खेळाडूंची निवड महाराष्ट्र रग्बी फुटबॉल संघात झाली असून, युवा खेळाडूंच्या महाराष्ट्र संघाने गुवाहाटी, भुवनेश्वर, ओडिशा आणि इतर राज्यात पार पडलेल्या राष्ट्रीय खेळात प्राविण्य प्राप्त केले आहे.

दरम्यान, मुंबई प्रमाणे नवी मुंबई ,पनवेल परिसरातील तरुणांमध्ये रग्बी खेळाची आवड निर्माण व्हावी आणि रग्बी खेळासाठी हक्काचे मैदान व्हावे यासाठी  ‘इंडियन रग्बी फुटबॉल युनियन'ने सिडकोकडे जागेची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घ्ोऊन,  खारघर सेक्टर-३३ मधील फुटबॉल मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रांजणपाडा गाव शेजारील खाडी किनारी रग्बी फुटबॉल मैदान उभारण्यासाठी  ‘सिडको'ने ‘इंडियन रग्बी फुटबॉल युनियन'ला  साडेतीन एकर जागा ११ वर्षांसाठी लीजवर उपलब्ध करुन दिली होती. मात्र, सदर जागा खाडी किनारी असल्यामुळे कांदळवन विभाग, वन विभाग यांचा अडथळा तसेच पर्यावरण प्रेमी आणि लोकप्रतिनिधी यांच्या वाढत्या विरोधामुळे ‘इंडियन रग्बी फुटबॉल युनियन' द्वारे सदर जमीन ‘सिडको'ला परत केली आहे. त्यामुळे खारघर मध्ये होणारा रग्बी खेळाच्या मैदानाचे स्वप्न भंगले आहे.
रग्बी फुटबॉल मैदान उभारण्यासाठी ‘सिडको'कडून खाडी किनारी साडेतीन एकर मिळाली होती. मात्र, सदर जागा खाडी किनारी असल्यामुळे वन आणि पर्यावरण विभागाचे अडथळे आल्याने ‘इंडियन रग्बी फुटबॉल युनियन' द्वारे सदर जागा ‘सिडको'ला काही महिन्यांपूर्वी परत करण्यात आली आहे. - संदीप मोसमकर, सहसचिव - रग्बी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण रेल्वे स्थानकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन