सीबीडीमध्ये एकाच रात्रीत चार घरे फोडली
चोरटयानी सीबीडी सेक्टर-1 मध्ये एकाच रात्रीत चार घरे फोडली
नवी मुंबई : मागील तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे चोरटयानी संधी साधुन सीबीडी सेक्टर-1 भागात एकाच रात्रीत चार घरफोडया करुन सुमारे 8 लाखांपेक्षा अधिक रक्कमेचा ऐवज चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. सीबीडी पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरटयाविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
सीबीडी सेक्टर-1 मधील सुनिल गावस्कर मैदानाजवळ बिल्डींग नं-ई-2 मध्ये कुटुंबासह राहणाऱया स्वाती शिराळकर (46) यांच्या वडिलांचे 19 जुलै रोजी निधन झाल्याने त्या आपल्या घराला कुलुप लावुन वडीलांच्या अंत्यविधीसाठी मुलासह पुणे येथे गेल्या होत्या. त्यांचे पती कामावर असल्याने त्यांचे घर बंद असल्याने तसेच मागील तीन चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने चोरटयानी संधी साधुन गुरुवारी पहाटेच्या सुमारास शिराळकर यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोख रक्कमेसह सोन्या चांदिचे दागिने व मोबाईल फोन, टॅब असा तब्बल 7 लाख 50 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला.
गुरुवारी सकाळी शिराळकर यांचे घर उघडे असल्याचे तसेच, त्यांच्या घराचा कडी कोयंडा तुटल्याचे शेजा-यांना निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ स्वाती शिराळकर यांना संपर्क साधुन त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मुलासह आपल्या घरी धाव घेऊन पहाणी केल्यानंतर त्यांच्या घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे चोरटयानी शिराळकर यांच्या बाजुच्या इमारतीत राहणाऱया लक्ष्मीकांत कटेवा (36) यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरात लावण्यात आलेले 3 सीसीटीव्ही कॅमेरे तोडून ते चोरुन नेल्याचेही उघडकीस आले आहे.
त्याचप्रमाणे बिल्डींग क्रमांक ई-3 मधील बंद फ्लॅट, बिल्डींग क्रमांक सी-4 मधील बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडण्यात आल्याचे आढळुन आले आहे. मात्र त्यात कुणीही राहत नसल्याने त्या फ्लॅटमधुन कोणताही ऐवज चोरीला गेला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सीबीडी पोलिसांनी या प्रकणात अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन चोरटयाचा शोध सुरु केला आहे.