नवी मुंबई-उरण एनएमएमटी बस सेवा बंद; प्रवाशांसह विद्यार्थ्याचे हाल

वाशी : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम (एनएमएमटी) तर्फे नवी मुंबई ते उरण दरम्यान धावणाऱ्या एनएमएमटी बस क्रमांक-३०, ३१ आणि ३४ या बसेस एनएमएमटी प्रशासनाने २२ फेब्रुवारी पासून अचानक बंद केल्या आहेत. त्यामुळे उरण मधील हजारो प्रवाशांसह शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हाल होत आहेत. त्यामुळे उरण मध्ये एनएमएमटी बस सेवा तात्काळ सुरु करावी, या मागणीकरिता उरण मधील नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले.

गेल्या ८ फेब्रुवारी रोजी  खोपटा येथे एनएमएमटी बसला झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे संतप्त  झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको करुन एनएमएमटी कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले होते. त्याच्या निषेधार्ह नवी मुंबई शहरातील जुईनगर रेल्वेस्थानक ते उरण मधील कोप्रोली-वशेणी गाव दरम्यानची ‘एनएमएमटी बस'ची ३४ क्रमांकाची बस सेवा ९ फेब्रुवारी पासून अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर एनएमएमटी बसेस द्वारे उरण ते कळंबोली, उरण ते कोपर खैरणे आणि जुईनगर ते वशेणी बस मार्ग क्रमांक-३०, ३१ या धावणाऱ्या एनएमएमटी बसेस देखील २२ फेब्रुवारी २०२४ पासून अचानक बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे उरण तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नोकरी, व्यवसाय, कामधंदा, शिक्षण आणि कार्यालयीन कामानिमित्त दररोज नवी मुंबई मध्ये जाणाऱ्या-येणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच  आर्थिक नुकसान होत आहे. सध्या दहावी आणि बारावी मधील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या वार्षिक परीक्षा सुरु असून, नवी मुंबई ते उरण दरम्यान धावणाऱ्या एनएमएमटी बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्रवासाची सार्वजनिक नवी मुंबई ते उरण दरम्यानची एनएमएमटी बस सुविधा कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता अचानकपणे बंद केलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई ते उरण दरम्यानची एनएमएमटी बस सेवा तातडीने सुरु करावी, अशी मागणी प्रवाशांद्वारे करण्यात आली होती. मात्र, या मागणीला नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने २६ फेब्रुवारी २०२४ रोजी उरण-चारफाटा येथे सीआयटीयू, किसान सभा, जनवादी महिला संघटना, डीवायएफआय आणि मावर्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रायगड तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत ‘एनएमएमटी'चे व्यवस्थापक योगेश कडुस्कर यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

एनएमएमटी प्रशासनाने नवी मुंबई-उरण दरम्यानची बंद केलेली एनएमएमटी बस सेवा पुन्हा सुरु करण्याबाबत अद्याप कुठलाही विचार केलेला नाही. याबाबत एनएमएमटी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडीत करण्याचे निर्देश