मराठा आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा
खा. राजन विचारे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
नवी मुंबई : महाराष्ट्रात सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु आहे. मराठा समाजाला सरकारी पातळीवर आरक्षण देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने महाराष्ट्रात सध्या असलेली तणावाची परिस्थिती लक्षात घेता शिवसेना नेते तथा ‘ठाणे'चे खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मराठा, धनगर, आदिवासी तसेच इतर जातीच्या आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या सदर पत्रामध्ये खासदार राजन विचारे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजाचे मोठे योगदान ऐतिहासिक काळापासून आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मराठा होते. त्यांनी संपूर्ण समाजातील अठरा पगड जाती आणि १२ बलुतेदारांना एकत्र करुन हिंदवी स्वराज्य, महाराष्ट्र निर्माण केला. आज देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे मराठा समाजाला न्यायाची गरज आहे, असे नमूद केले आहे.
तसेच सन २०१४ मध्ये देशात सत्तेवर आल्यानंतर आपण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य चालवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आरक्षणाबाबत येथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्रात ५७ हुन अधिक मोर्चे आणि आंदोलने झाली आहेत. अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्तापर्यंत ८ युवकांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी गेल्या दोन महिन्यांमध्ये ४ आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण गणेशोत्सवाच्या दिवसात महिला आरक्षणाबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलवले होते, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सद्यस्थितीत असलेले तणावाचे वातावरण लक्षात घेऊन मराठा, धनगर, आदिवासी आणि इतर जातीच्या आरक्षणा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा गांभीर्याने विचार करुन संविधान नुसार आरक्षणाच्या मुद्द्याला कायदेशीर दर्जा देण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.