नवी मुंबई शहर स्थितीचा, पावसाळापूर्व कामांचा महापालिका आयुवतांकडून आढावा

नवी मुंबई : १३ मे रोजी सायंकाळी आलेल्या आकस्मिक वादळामुळे आणि पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रात उद्‌भवलेली आपत्तीजनक परिस्थिती तसेच मुंबईतील घाटकोपर येथे घडलेली मोठे होर्डिंग्ज कोसळल्याची दुर्घटना याचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी १४ मे रोजी तातडीने दूरदृश्य प्रणाली द्वारे अधिकारीवर्गाची बैठक घेत शहरातील परिस्थिती जाणून घेतली. तसेच आपत्ती सांगून येत नसल्यामुळे २४X७ सतर्क राहण्याचे आयुवतांनी निर्देश दिले.

१३ मे रोजी सायं. ४.०५ पासून ५.३५ पर्यंत ताशी १०७ कि.मी. वेगाने वादळी वाऱ्यांसह अकाली पर्जन्यवृष्टी सुरु झाली. आयुक्त डॉ. शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिकेची सर्व यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर मदत कार्यासाठी तात्काळ कार्यान्वित झाली आणि ८ वाजेपर्यंत वादळामुळे पडलेली झाडे-फांद्या, २ ठिकाणी वाकलेले विजेचे खांब, काही ठिकाणी उडालेले पत्रे यावर कार्यवाही करत रहदारीचे अडथळे दूर करुन जनजीवन सुरळीत करण्यात आले. महापालिकेच्या विभागीय स्तरावर तत्पर कार्यवाही झाल्याने आणि नागरिकांना बचाव, मदतीचा तात्काळ संदेश निर्गमित झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

तथापि या आकस्मिकपणे उद्‌भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीचा विचार करुन पूर्व खबरदारी घेत आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शिरीष आरदवाड, शहर अभियंता संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधत विभागनिहाय परिस्थितीचा बारकाईने आढावा घेतला.

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळण्याची घडलेली दुर्घटना लक्षात घेत नमुंमपा क्षेत्रातील अंतर्गत भागात तसेच महामार्ग, रेल्वे हद्द, एमआयडीसी भागात लावण्यात आलेल्या होर्डिंग स्वरुपातील जाहिरात फलकांचे रचनात्मक परीक्षण (Structural Audit) करण्याच्या यापूर्वीच दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी झाली असल्याची खातरजमा करुन घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आयुक्तांनी दिल्या.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात असलेल्या एकूण होर्डिेगची संख्या, त्यांचे आकारमान, त्यामधील परवानगी दिलेल्या होर्डिंगची संख्या याची माहिती त्वरीत संकलित करुन सादर करावी. तसेच अधिकृत होर्डिंगवर ते अधिकृत असल्याचे चिन्ह प्रदर्शित करण्याची कार्यवाही करणे. त्याचप्रमाणे अवैध, अनधिकृत जाहिरात फलक निष्कासनाची कार्यवाही करण्यात यावी. जाहिरात फलक कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी वादळी वारे, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीसमयी नागरिकांनी जाहिरात फलकाच्या आजुबाजुला न थांबण्याबाबत आवाहन व्यापक स्वरुपात प्रसारित करण्यात यावे, असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सूचित केले.

होर्डिंगप्रमाणेच ठिकठिकाणी असलेल्या मोबाईल टॉवर्सच्या सुरक्षिततेबाबतही सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यात यावा. या वादळी कालावधीत अनेक ठिकाणी गच्चीवरील, घरांवरील पत्रे उडाले असल्याचे निदर्शनास आले असून याबाबत काळजी घेण्याच्या सूचना सोसायट्यांना आणि वसाहतींना देण्यात याव्यात, असेही आयुक्त डॉ. शिंदे यांनी सूचित केले.

दरम्यान, सी-१ श्रेणीच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून पूर्व खबरदारी घेण्यात यावी. शहरात डेब्रिज आणून टाकले जाते अशा ठिकाणी विभाग अधिकारी यांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष द्यावे. याबाबत जबाबदारी निश्चित केली जाईल, असे आयुवत डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.

पावसाळापूर्व कामांना यापूर्वीच १५ मे पर्यंत डेडलाईन दिली असून येत्या एक ते दोन दिवसात सर्व कामे पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्याचे यावे. एमआयडीसी भागातील स्वच्छता आणि पुनर्पृष्ठीकरण कामांकडेही बारकाईने लक्ष द्यावे. १३ मे रोजीच्या आपत्ती प्रसंगात नागरिकांना दिलासा देणारी तत्पर सेवा सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी पुरविली. अशाच प्रकारे यापुढील काळातही सतर्कतेने काम करावे. - डॉ. कैलास शिंदे, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशीतील बालनाट्य अभिनय कार्यशाळेची सांगता