मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उरण नगर परिषद, १७ ग्रामपंचायतींनी थकवली ५९ कोटींची पाणीपट्टी
१७ ग्रामपंचायतींकडे २८ कोटी तर ‘उरण नगरपरिषद'कडे ३२ कोटींची थकबाकी
उरण : उरण तालुक्यातील २० ग्रामपंचायतींना ‘एमआयडीसी'च्या रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, सदर २० पैकी १७ ग्रामपंचायतींनी ‘एमआयडीसी'चे गेली कित्येक वर्षे पाणी बिल भरले नसल्याने त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची पाणी बिलाची थकबाकी आहे. सदर ग्रामपंचायतींकडे ‘एमआयडीसी'ची पाणी बिलाची मार्च-२०२४ अखेर २७ कोटी ६३ लाख ३४ हजार १५५ रुपये इतकी थकबाकी आहे. तसेच ‘उरण नगरपरिषद'कडे ३१ कोटी ६७ लाख ०५ हजार १७१ रुपये इतकी थकबाकी आहे. त्यामुळे ‘एमआयडीसी'च्या विकास कामांना गती मिळत नाही.
उरण तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि २० ग्रामपंचायत हद्दीमधील गावातील रहिवाशांना ‘एमआयडीसी'च्या माध्यमातून रानसई धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी थकबाकीदार ग्रामपंचायती या नागरिकांकडून नित्यनियमाने पाणीपट्टी वसूल करण्याचे काम करीत आहेत. तसेच जेएनपीए, ओएनजीसी, बीपीसीएल, महावितरण कंपनी, आदि प्रकल्पांसह गांव परिसरात निर्माण झालेल्या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदाम, यार्डमुळे अनेक ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सधन झाल्या आहेत. मात्र, तरीही ‘एमआयडीसी'ला पाण्याचे बील भरण्यासाठी त्यांच्याकडून टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या ग्राममपंचायतींकडे कोट्यवधींची थकबाकी साठून राहत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे सदर ग्रामपंचायतींनी पाणी पुरवठ्याची थकबाकी भरल्यास त्यांची मीटर नादुरुस्त दंड, मंजूर कोटा दंड, मीटर भाडे आणि विलंब शुल्क माफ करण्याचे ‘एमआयडीसी'ने या अगोदर जाहिर देखील केले आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक जाणून-बुजून पाणी पट्टी भरण्यासाठी चालढकलपणा करीत आहेत. अशी बाब थकीत पाणीपट्टीच्या माध्यमातून समोर येत आहे.
उरण तालुक्यातील नवीन शेवा १ कोटी ११ लाख ८४ हजार ११५, हनुमान कोळीवाडा ४२ लाख ६६ हजार ९९६, करळ ९७ लाख ४८ हजार २७६, धुतुम १ कोटी ४१ लाख ९३ हजार ९४४, जसखार २ कोटी २४ लाख ५९ हजार १६२,बोकडविरा -१४ लाख ५९ हजार ७९६ , फुंडे ३ कोटी ३६ लाख ९६ हजार ३२६, सावरखार ६० लाख ६३ हजार २७१, डोंगरी ६८ लाख ३३ हजार ४७७, सोनारी ३४ लाख ८१ हजार ९८२, भेंडखळ १५ हजार ५९३, नागांव १ कोटी ६१ लाख ७४ हजार ४५०, चाणजे ९ लाख ११ लाख ८७ हजार ८४५, पाणजे ९ लाख ११ हजार २२७, चिर्ले २ कोटी ३० लाख २१ हजार २६९, केगांव २ कोटी २० लाख ९५ हजार २०५, म्हातवली ९५ लाख ४१ हजार २२२ या १७ औद्योगिकीकरण आणि ‘सिडको'च्या हद्दीतील ग्रामपंचायतींनी ‘एमआयडीसी'चे करोडो रुपये थकवले आहेत. तसेच ‘उरण नगरपरिषद'कडे ३१ कोटी ६७ लाख ०५ हजार १७१ रुपयांची थकबाकी आहे.
पाणीपट्टी वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटीसाही बजावण्यात येत आहेत. तसेच वारंवार ‘पंचायत समिती'च्या गटविकास अधिकाऱ्यांना देखील त्या संदर्भात माहिती देण्यात येत आहे. सोनारी ग्रामपंचायत कडून थकीत बिलाची रक्कम भरण्यात आली असल्याने या ग्रामपंचायतीच्या बिलात सूट देण्यात आली. जर उर्वरित ग्रामपंचायतींनी थकीत बिलाची रक्कम भरण्यास पुढाकार घेतला तर त्यांनाही बिलात सूट देण्यात येणार आहे. मात्र, असे असतानाही थकबाकीदार ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्याचा फटका प्रामुख्याने ‘एमआयडीसी'च्या विकास कामांना निश्चित बसत आहे, अशी माहिती ‘एमआयडीसी'चे उपअभियंता पाचपुंडे यांनी दिली. तसेच थकबाकीदार ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीसह वीज देयके भरल्यास त्यांची दंडाची, मीटर नादुरुस्त शुल्क, विलंब शुल्क आदि माफ करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनी आपली पाणीपट्टी लवकरात लवकर भरावी, असे आवाहन उपअभियंता पाचपुंडे यांनी ग्रामपंचायतींना केले आहे.