हवेतील प्रदुषण; उपाययोजनांसाठी पनवेल महापालिकेत बैठक संपन्न
पनवेल : गेल्या काही दिवसांपासून एमएमआर परिसरातील हवेची गुणवत्ता बिघडल्याने उच्च न्यायालयाने सुमोटो जनहित याचिका दाखल केली आहे. यामधील सुनावणी दरम्यान हवेतील प्रदुषण कमी करणे कामी उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रभावी उपाययोजना अमंलबजावणी करण्याकरिता आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या सुचनेनुसार पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील संबंधित विभागासोबत २८ मे रोजी मुख्यालयात बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीस उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुनिल बोंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक (वाहतूक) नरेंद्र औंटी, एसटी महामंडळाचे अधिकारी ज्ञानेश्वर म्हात्रे, पोलीस निरीक्षक मनोज महाडिक, घनकचरा-स्वच्छता विभाग प्रमुख अनिल कोकरे, पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, आदि उपस्थित होते.
उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबई शहरात जाणाऱ्या वाहनांच्या टायरवरील धूळ कमी करण्याच्या दृष्टीने खारघर टोल नाक्यावर फवारे बसविण्याचा अभिनव उपक्रम राबविला होता. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम क्षेत्रांना उंच कंपाऊंड घालणे, डेब्रीज वाहतुकीच्या ट्रकवर कापड झाकणे अशा विविध उपाययोजना अमंलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यानंतर आता एमएमआर क्षेत्रातील प्रदुषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने संबधित पोलीस विभाग, वाहतूक विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, एसटी महामंडळ, महाराष्ट्र राज्य प्रदुषण मंडळ अशा विविध विभागातील निर्णयक्षम अधिकाऱ्यांची समिती बनविण्याचे आदेश दिले आहेत. सदर आदेशानुसार २८ मे रोजी या विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी हवेतील प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
हवेतील प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने संबधित विभागातील अधिकाऱ्यांची समिती बनविल्यानंतर प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून कामाचा आराखडा आखणे, पथक निर्मिती करणे, वॉर रुम तयार करणे, दंडाची निश्चिती करणे अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांनी आपली मते मांडली. दरम्यान, येत्या काही दिवसातच समिती बनवून हवेतील प्रदुषण कमी करण्याच्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी सांगितले.