एमआयडीसी मधील रहिवाशांचे दोन दिवस पाण्याविना हाल?

वाशी : एमआयडीसी मार्फत ५ जून रोजी काटई नाका ते शिळफाटा दरम्यान तातडीच्या कामानिमित्त २४ तास पाणी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, या पाणी बंद बाबत सविस्तर माहिती एमआयडीसी भागातील रहिवाशांना मिळाली नसल्याने एमआयडीसी भागातील रहिवाशांचे ५ आणि ६ जून या दोन दिवशी पाण्याविना हाल झाले.

नवी मुंबईतील बेलापूर ते ऐरोली या शहरी भागात मोरबे धरणातून नवी मुंबई महापालिका पाणी पुरवठा करते. तर औद्योगिक वसाहतीत एमआयडीसी द्वारे बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, एमआयडीसी द्वारे होणाऱ्या पाणी पुरवठ्याचा दाब कमी असल्याने आजही शेकडो कारखाने ‘टँकर'चा आसरा घेतात. परंतु, एमआयडीसी भागातील गरीब, गरजू लोकांना टँकर परवडत नसल्याने त्यांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. नवी मुंबई मधील एमआयडीसी भागात दर शुक्रवारी पाणी बंद असते. मात्र, ५ जून रोजी काटई ते शीळ दरम्यान तातडीचे काम काढण्यात आल्याने ५ जून रोजी रात्री १२ वाजल्यापासूनच पाणी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी  पाणी येईल अशी एमआयडीसी भागातील नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, ६ जून रोजी देखील अत्यंत कमी दाबाने पाणी आल्याने एमआयडीसी भागातील महिलांनी पाण्यासाठी रांग लावली होती. ६ जून रोजी तुर्भे इंदिरानगर, तुर्भे हनुमाननगर, आंबेडकर नगर, गणेश नगर, तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, महात्मा गांधी नगर, नेरुळ एलपी, शिरवणे येथील रहिवाशांचे पण्याविना हाल झाले.

दरम्यान, एमआयडीसी मार्फत ज्या-ज्या वेळी देखभाल, दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवण्यात येते त्या-त्या वेळी त्याबाबतची माहिती वर्तमान पत्रात जाहीर केली जाते, अशी माहिती ‘एमआयडीसी'चे  सहाय्यक अभियंता (पाणी पुरवठा विभाग) नरेंद्र नवले यांनी दिली.

एमआयडीसी भागातील रहिवासी भागात एमआयडीसी मार्फत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याचा दाब नेहमीच कमी असतो. एमआयडीसी वारंवार देखभाल, दुरुस्तीसाठी पाणी बंद ठेवत असल्याने एमआयडीसी भागातील रहिवाशांचे पाण्याविना हाल होतात. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने एमआयडीसी भागात मोरबे धरणातून पाणी पुरवठा करण्याची गरज आहे. - खाजामिया पटेल, उपाध्यक्ष - रिपब्लिकन सेना, महाराष्ट्र प्रदेश. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नागरी सहभागातून ‘ठाणे सुंदर, हरित-प्लास्टिकमुक्त' करणे शक्य -आयुवत सौरभ राव