आंबिवली-मुरबाड नवीन रेल्वे मार्गाविरोधात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

कल्याण :  कल्याण तालुक्यातील मानिवली गावाच्या शेतकऱ्यांच्या जमिनी आंबिवली मुरबाड या नवीन रेल्वे लाईन मार्गामुळे संपादित केल्या जाणार असल्याने या मार्गाविरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आपणापुढे सामुहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सुनील गायकर या शेतकऱ्याने सांगितले. त्याने तशा आशयाचे  निवेदन रेल्वेच्या उप मुख्य अभियंता निर्माण कार्यालय, नवी मुंबई यांना दिले आहे.

मागील आठवड्यात आंबिवली मानिवली मुरबाड या २८किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वे लाईनसाठी संयुवत सर्वे मानिवली येथे सुरू असताना तो गावातील शेतकऱ्यांनी बंद पाडला होता, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रेल्वेसाठी सर्व्हे नंबर११२ व इतर मिळकती मधील एकूण १९७०गुंठे जागा बाधित होणार आहे. याशिवाय २५०० फळझाडे व २ हजार जंगली झाडे या प्रकल्पात तुटली जाणार आहेत. यावर पर्याय म्हणून सरकारी गायरान सर्वे नंबर १०२मध्ये ३३ हेक्टर ६३गुंठे  इतकी उपलब्ध आहे शिवाय ही जमीन उंचावर असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. मात्र असे असताना या जागेचा वापर न करता आम्हा शेतकऱ्यांच्याच मानगुटीवर हा प्रकल्प का, असा सवाल बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. रेल्वे प्रकल्पामुळे आमची राहती घरे, बागायती उपजाऊ जमीन, झाडेही यामध्ये बाधित होणार असून शेतकऱ्यांवर स्थलांतराचा प्रसंग येणार असल्याने प्रकल्पामुळे स्थलांतर आम्हाला मान्य नाही असे सांगत सरकारी जागेतून ही नवीन रेल्वे गेल्यास आमची हरकत असणार नसेल; पण आमच्या जमीनीतून प्रकल्प नेण्यास आमचा तीव्र विरोध व हरकत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आमचा भारतीय राज्यघटनेवर व न्यायव्यवस्थेवर पुर्ण भरवसा व विश्वास असून भारतीय संविधान परिछेद २१नुसार समान न्याय मिळविण्याचा पुर्ण अधिकार आहे, मात्र राज्यकत्यार्वर विश्वास नसल्याने न्याय न मिळाल्यास आम्हाला सामुहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असून प्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा गायकर यांनी दिला आहे. तसे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी, उप मुख्य अभियंता, निर्माण कार्यालय जुईनगर, नवी मुंबई, कल्याण तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर  सुनील गायकर, चंद्रकांत गायकर, सुनील दगडू गायकर, व्दारकानाथ गायकर, रमेश केणे, भालचंद्र गायकर, विलास गायकर, सुनील केणे, संतोष वारघडे, गजानन काळण आदींच्या स्वाक्षऱ्या असून आणखी शेतकऱ्यांच्या सह्या देऊन लवकरच उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘जलजीवन मिशन'ची रखडली ६ ठिकाणची कामे