मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
माननीय उच्च न्यायालयाने पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कराला स्थगिती दिली नाही
पनवेल: पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे पाच दिवस शिल्लक राहीले असून, मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान आज मा.उच्च न्यायालयात खारघर फोरम यांच्यावतीने महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात जनहित याचिकेवरती सुनावणी घेण्यात आली. माननीय उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि मा.न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्यापुढे झालेल्या सुनावणीमध्ये मा. उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. या सुनावणीमध्ये महापालिकेच्यावतीने जेष्ठ विधीज्ञ ॲङ आशुतोष कुंभकोणी यांच्या समवेत ॲङ केदार दिघे यांनी या याचिकेमध्ये विधीज्ञ म्हणून काम पाहिले.
मालमत्ता कर भरण्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख असून , ज्या मालमत्ताधारकांनी आपले मोबाईल नंबर आपल्या खात्याशी कनेक्ट केले नाहीत त्यांनी आपले मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावे जेणे करून मालमत्ता कराचे बिल प्रत्यक्ष त्याच मालमत्ताधारकाच्या मोबाईलवरती जाईल. तसेच मालमत्ता बिलात किरकोळ दुरूस्त्या असतील तर त्या तातडीने करून घ्याव्यात असे आवाहन मालमत्ता कर विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे चार दिवस राहील्याने शनिवार व रविवार कार्यालये नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहे . मा. उच्च न्यायालयाने कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने तसेच पुढील वर्षाची दोन टक्के शास्ती वाचविण्यासाठी मालमत्ताधारकांनी 31 मार्चपूर्वी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
सध्या 17 वसुली पथकांच्या माध्यमातून महापालिका कार्यक्षेत्रात वसुली मोहिम सुरू आहे.पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध नोडमध्ये सुमारे 450हून अधिक जप्तीपूर्वीच्या नोटीसा तसेच 16 वॉरंट नोटीसांचे वाटप थकबाकीदार मालमत्ता धारकांना दिल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतू आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या होत्या यांना आता वॉरंट नोटीसा देण्याचे काम पालिकेने युध्दपातळीवर सुरू केले आहे. तसेच अटकावणीच्या मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे. याचा थकबाकीदार यांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन सातत्याने रिक्षामधून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून चारही प्रभागांमध्ये केले जात आहे. या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसापासून दररोज 1 कोटीहून अधिक भरणा होताना दिसत आहे. आज एका दिवसात सुमारे 2 कोटी 78 हजाराचा भरणा पालिकेच्या तिजोरीत झाला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात 3लाख 50 हजार निवासी, बिगर निवासी, व्यावसायिक, औद्योगिक आदी नोंदणीकृत मालमत्ता आहेत. या मालमत्ता धारकांकडून कर वसुलीसाठी महापालिकेचे विविध झोन तयार केले आहेत. तसेच ऑनलाईन आणि विविध ॲपच्या माध्यमातून कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 327 कोटी मालमत्ता कर जमा झाला आहे. नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महापालिकेत न येता ऑनलाईन पध्दतीने भरता यावा यासाठी महापालिकेने 'सिटीझन प्रॉपर्टी टॅक्स पेमेंट गाईड ' तयार केले आहे.
महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340 या टोल फ्री क्रमांवरती संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.