जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ

योगाप्रमाणेच खेळ वाचण्याचा अथवा बघण्याचा विषय नव्हे -उपायुवत माळवे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका ‘क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभाग'च्या वतीने नेरुळ, सेक्टर-१९ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण मधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैदानात जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ ‘क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभाग'च्या उपायुक्त मंगला माळवे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, अभिलाषा म्हात्रे-पाटील, जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा समिती सदस्य धनंजय वनमाळी आदि मान्यवर तसेच विविध शाळांचे क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक आणि ‘ठाणे जिल्हा फुटबॉल असोसिएशन'चे पंच उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेला शालेय क्रीडा स्पर्धांकरिता जिल्ह्याच्या दर्जा प्राप्त झाल्याने महापालिका क्षेत्रातील अनेक होतकरु खेळाडुंना यांनतर थेट विभागीय स्तरावर आपले क्रीडाकौशल्य दाखविण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. नुकत्याच झालेल्या ‘आंतरराष्ट्रीय योग दिन' निमित्ताने योग केवळ बघण्याचा अथवा वाचण्याचा विषय नसून प्रत्यक्ष करण्याचा विषय आहे. त्यानुसार खेळ सुध्दा फक्त वाचण्याचा अथवा बघण्याचाच विषय नसून प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा अनुभव घेण्याचा विषय असल्याचे उपायुवत माळवे यांनी सांगितले. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी खेळले पाहिजे असे सांगत त्यांनी नवी मुंबईमध्ये इतर शहरांच्या तुलनेत क्रीडा स्पर्धांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात शाळांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग दिसून येतो, याबद्दल आनंद त्यांनी व्यक्त केला. 

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महापालिकांना आपापल्या कार्यक्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झालेला असून सन २००९-२०१० पासून ‘नवी मुंबई महापालिका क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभाग'च्या वतीने स्वतंत्रपणे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धांमध्ये नमुंमपा क्षेत्रातील २३० हुन अधिक शाळांमधून ३५ हजारहून अधिक खेळाडू उत्साहाने सहभागी होत असून त्यामध्ये शासन मान्यताप्राप्त ४९ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचा समावेश आहे. यामध्ये इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही खेळाच्या वैयक्तिक आणि सांघिक प्रकारातील स्पर्धांचे आयोजन केले जाते.

सदर जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शुभारंभाचा फुटबॉलचा सामना सेंट झेव्हियर्स-नेरुळ आणि ॲव्हेलॉन हाईटस्‌-वाशी या दोन संघामध्ये खेळविण्यात आला. यामध्ये सेंट झेव्हियर्स संघाने ॲव्हेलॉन हाईटस्‌ संघावर १-० अशी मात करीत सामना जिंकला.

नवी मुंबई महापालिकेला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त असल्याने या स्पर्धांमधील उत्तम खेळाडुंना थेट विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे या स्पर्धांमधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःसोबतच नवी मुंबई शहराचा नावलौकिक वाढविणारे खेळाडू घडत असल्याचे दिसून येत आहे.

 

Read Previous

लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी

Read Next

जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत महापालिका शाळेची मैदान गाजविण्यास सुरुवात