शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली 44 लाख 72 हजार रुपये उकळणाऱ्या टोळीतील दुक्कली गजाआड

नवी मुंबई : शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा फायदा होत असल्याचे बनावट ऍपद्वारे दाखवून नेरुळमध्ये राहणा-या व्यक्तीकडुन तब्बल 44 लाख 72 हजार रुपये उकळणा-या टोळीतील दोघांना पकडण्यात नवी मुंबई सायबर पोलिसांना यश आले आहे. निलेश अरुण इंगवले (30) व संजय रामभाऊ पाटील (48) अशी या दोघांची नावे असून या आरोपींचा देशभरातील विविध राज्यातील एकुण 10 सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. सायबर पोलिसांनी वेळीच या आरोपींची बँक खाती गोठविल्यामुळे या गुह्यातील 18 लाख 51 हजार रुपये गोठविण्यात यश आले आहे.  

या प्रकरणातील सायबर टोळीने गत महिन्यामध्ये नेरुळमध्ये राहणाऱया 49 वर्षीय व्यक्तीला शेअर्स खरेदी विक्री ट्रेडिंगच्या नावाखाली जास्तीचा फायदा होत असल्याचे बनावट ऍपद्वारे दाखवुन त्यांचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर त्यांना या शेअर्स ट्रेडिंग मध्ये जास्तीचा फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडुन तब्बल 44 लाख 72 हजाराची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर ऑनलाईन पध्दतीने भरण्यास भाग पाडले होते. त्यानंतर या टोळीने तक्रारदाराने गुंतवणुक केलेली रक्कम त्यांना परत न करता त्यांची फसवणुक केली होती.  

नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनखाली पोलीश शिपाई नरहरी क्षीरसागर यांनी या गुह्याचा सखोल तांत्रिक तपास करुन आरोपींनी वापरलेले बँक खाते व मोबाईल क्रमांकावरुन सदर बँक खाते वापरणारा निलेश अरुण इंगवले याला कामोठे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार संजय रामभाऊ पाटील याच्या सोबत मिळुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर सायबर पोलिसांनी आरोपी संजय पाटील याला ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे विविध बँक खात्यांचे चेकबुक, डेबिट कार्ड तसेच सिमकार्ड सापडले.

प्राथमिक तपासात संजय पाटील हा अन्य साथीदारांच्या संपर्कात असल्याचे आढळुन आले असून सायबर पोलिसांकडुन अधिक तपास करण्यात येत आहे. न्यायालयाने या दोन्ही आरोपींची 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणात फसवणुक झालेल्या तक्रारदाराने ज्या बँक खात्यात रक्कम भरली होती, ते सर्व बँक खाते गोठविण्याबाबत तात्काळ पत्र व्यवहार केल्याने सदर बँक खात्यातील 18 लाख 51 हजार रुपये गोठविण्यात सायबर पोलीस ठाण्यास यश आले आहे  

अटक आरोपीकडे 5 चेकबुक व 6 डेबिट कार्ड तसेच 4 मोबाईल फोन, 10 सिमकार्ड सापडले आहेत. आरोपी संजय पाटील हा सायबर फसवणुकीकरिता वापरण्यात येत असलेले बॅक खाते हाताळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या आरोपीचा महाराष्ट्र राज्यातील तसेच भारत देशातील विविध राज्यातील एकुण 10 सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.  

सदरचा गुन्हा गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त अमित काळे, आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक लिंगराम देवकत्ते, पोलीस शिपाई एकनाथ बुरुंगले, नरहरी क्षिरसागर यांनी उघडकीस आणला आहे. 

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

वाशीमध्ये धारधार शस्राने हल्ला करुन तरुणाची निर्घृण हत्या