पनवेल महापालिकेच्या शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान'

पनवेल : पनवेल महापालिकेच्या १० शाळांमध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' १९ जानेवारी रोजी सुुरु करण्यात आले. यानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धां अंतर्गत कबड्डी सामन्यांचे उद्‌घाटन उपायुक्त गणेश शेटे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, प्रशासकीय अधिकारी किर्ती महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, खेळाडू, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' अंतर्गत विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील, व्यवस्थापनातील आणि निर्णय प्रक्रियेमधील सहभाग वाढविण्यासाठी ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना'च्या अनुषंगाने शाळेच्या आवारात परसबागेची निर्मिती करुन त्याद्वारे आरोग्यदायी भाजांची लागवड करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि वैयक्तिक विकासासाठी वाचन चळवळ सुरु करण्यात आली आहे. वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा, संगीत स्पर्धा तसेच इतर कला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर ‘अभियान'मध्ये राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेला देशातील एक राज्य निवडून त्याचा सांस्कृतिक वारसा जसे पेहराव, खानपान, सण-उत्सव आदिंबाब राष्ट्राच्या उभारणीत त्या राज्याचे योगदान त्याची महती दर्शविणारे सादरीकरण करण्यात येणार आहे.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' अंतर्गत विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकरिता आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर बदलत्या जीवन शैलीमुळे लहान वयातच होऊ लागलेला  लठ्ठपणा, मधुमेह आणि डोळयांचे विकार यासारख्या आजारांची माहिती, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय यासाठी तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. तसेच किशोरवयीन विद्यार्थिंनींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन बाबत समुपदेशन सत्राचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. याचबरोबर हात स्वच्छ धुवण्याचे योग्य पध्दतीचे प्रात्यक्षिक देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकांचे व्यवहार, कर्ज आणि व्याज आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. याचबरोबरीने स्वयंरोजगार, व्यवसाय, व्यापार, उद्योग अशा क्षेत्रात भविष्यात करिअर घडविण्यासाठी विशिष्ट कौशल्यावर आधारित व्यवसाय शिक्षणाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी तज्ञ व्यक्तींच्या व्याख्यानाचेही आयोजन करण्यात येणार आहे.

महापालिका आयुक्त गणेश देशमुख आणि अतिरिवत आयुक्त भारत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान' अंतर्गत महापालिकेच्या १० शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

मतदानाद्वारे प्राथमिक विद्यार्थ्यांनी निवडले आदर्श विद्यार्थी