महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
मुलांना मॉडेल बनविण्याचे स्वप्न दाखवून लुबाडणूक
महिलेची २.७५ लाखांना फसवणूक
नवी मुंबई : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांकडून नागरिकांना लुबाडण्यासाठी वेगवेगळ्या क्लृत्या लाढवल्या जात असतात. सायबर चोरट्यांनी आता लहान मुलांमधील मॉडेल निवडण्यात येत असल्याची जाहिरातबाजी करुन सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मुलांना मॉडेल बनविण्याचे स्वप्न दाखवत त्यांना ऑनलाईन टास्क फ्रॉडमध्ये अडकवून लुबाडण्याचे प्रकार सुरु केले आहेत. असाच प्रकार कामोठेतील एका महिलेसोबत घडला असून सायबर टोळीने या महिलेकडून अशाच पध्दतीने २ लाख ७५ हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कामोठे पोलिसांनी या टोळी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील ३४ वर्षीय तक्रारदार महिला रोशनी या कामोठे भागात राहण्यास असून २० डिसेंबर रोजी त्यांच्या फेसबुकवर नेक्स्ट टॉप किड मॉडेल अशी जाहिरात निदर्शनास आली होती. त्यावर संपर्कासाठी देण्यात आलेल्या टेलिग्रामच्या लिंकवर रोशनी यांनी क्लिक केल्यानंतर त्यावर लहान मुलांचे मॉडेलींगचे फोटो त्यांच्या निदर्शनास आले. समोरील सायबर चोरट्याकडून रोशनी यांना देखील त्यांच्या मुलाचे फोटो मॉडेलिंगसाठी पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रोशनी यांनी आपल्या मुलाचे फोटो सदर टेलिग्राम ग्रुपवर पाठविल्यानंतर त्या टेलीग्राम आयडीवर जे फोटो आहेत, त्यांना लाईक केल्यास त्यांना पॉईंट मिळतील असे रोशनी यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना एक लिंक देण्यात आली.
सदर लिंक ओपन करुन रोशनी यांना एक ग्रुप जॉईन करण्यास सांगण्यात आले. तसेच सदर पेज लाईक केल्यास त्यांना पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. त्यावेळी रोशनी यांनी सायबर चोरट्याच्या सांगण्यानुसार आपल्या अकाऊंटची माहिती त्यांना पाठवून दिली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी १५० रुपये रोशनीच्या अकाऊंटवर पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर रोशनी यांना २ हजार रुपयांचा टास्क खेळण्यास सांगण्यात आले. २ हजार रुपये रोशनीने पाठवले असता, त्याचे २८०० रुपये त्यांना पाठविण्यात आले. त्यानंतर पुढील टास्क रोशनीला ७ हजार रुपयांचा देण्यात आला, सदर रक्कम रोशनी यांनी पाठवून दिल्यानंतर त्यांना ९१०० रुपये देण्यात आले.
अशा पध्दतीने सायबर चोरट्यांकडून रोशनी यांना मोठी रक्कम पाठविण्यास सांगण्यात येऊ लागली. त्यानुसार रोशनी पैसे भरत गेल्या. अशा प्रकारे सायबर चोरट्यांनी रोशनीकडून २ लाख ७५ हजार रुपये उकळल्यानंतर देखील त्यांच्याकडून आणखी पैशांची मागणी करण्यात येऊ लागली. पैसे नसल्याने रोशनी यांनी अधिकचे पैसे देण्यास नकार दिला. यादरम्यान रोशनीचे पती घरी आल्यानंतर त्यांनी पतीला याबाबत माहिती दिल्यानंतर सदर प्रकार फसवणुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.