मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
जेएनपीटी बंदरात परदेशातून आलेल्या कंटेनरमधुन 5 कोटी 77 लाख रुपये किंमतीचे सिगारेट जप्त
डीआरआय ची न्हावा शेवा येथील कंटेनर फ्रेट स्टेशन मध्ये कारवाई
नवी मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने न्हावाशेवा बंदरात आलेल्या एका कंटेनरमधुन 5 कोटी 77 लाख रुपये किंमतीचे तब्बल 33 लाख 92 हजार सिगारेट जप्त केले आहेत. चिंच असल्याचे भासवून हे सिगारेट्स चिंचेच्या पेटीमध्ये लपवून परदेशातुन तस्करी करुन आणण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. डीआरआयने आता या सिगारेटच्या तस्करी मध्ये गुंतलेल्या तस्करांचा शोध सुरु केला आहे.
जवाहरलाल नेहरु बंदरात परदेशातून आलेल्या व न्हावा शेवा येथील कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) मध्ये ठेवण्यात आलेल्या एका 40 फूट कंटेनरमध्ये सिगारेटचा साठा लपवून आणण्यात आल्याची माहिती डीआरआय ला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे डीआरआयच्या पथकाने गुरुवारी न्हावा शेवा येथील कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस) मध्ये ठेवण्यात आलेल्या 40 फूट रेफ्रिजरेटेड कंटेनरची तपासणी केली. या तपासणीत चिंचेच्या पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये सिगारेटची पाकिटे लपवून ठेवण्यात आल्याचे आढळुन आले. चिंचेच्या पुठ्ठ्याचे बॉक्स उघडल्यानंतर देखील सिगारेटची पाकिटे सापडू नयेत यासाठी चिंचेच्या पेटयाच्या आत मध्ये सिगारेटची पाकिटे ठेवण्यात आली होते. तसेच चतुराईने सर्व बाजूंनी चिंचेने झाकण्यात आले होते.
या कारवाईत डीआरआयच्या पथकाने सदर कंटेनरमधून 33 लाख 92 हजार सिगारेट्सचा साठा जप्त केला आहे. या सिगारेट्सची बजारातील किंमत सुमारे 5 कोटी 77 लाख इतकी आहे. सिगारेट ओढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो. त्यामुळे देशाच्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर भार पडत असल्याने सरकार अशा वस्तूंवर जास्त शुल्क आकारते. तंबाखू सारख्या उत्पादनांचे आयात करण्यासाठी लागणारे जास्त शुल्क टाळण्यासाठी छुप्या पद्धतीने तस्करीच्या मार्गाने सिगारेट व इतर तंबाखुजन्य पदार्थ आणण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.