नवी मुंबईतील ११२९ कोटींच्या सुविधा कामांचे लोकार्पण-भूमीपुजन

नवी मुंबई : ‘महाराष्ट्र'च्या ग्रोथ इंजिनची नवी मुंबई अश्वशक्ती असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महापालिकेच्या ११२९ कोटी रवकमेच्या विविध प्रकल्पांचे भूमीपुजन आणि लोकार्पण केले. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थान येथून दूरदृष्टी प्रणालीद्वारे ऑनलाईन संपन्न झालेल्या या विशेष समारंभप्रसंगी शंभूराज देसाई, संजय बनसोडे, आमदार गणेश नाईक, आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, आमदार  रमेश पाटील, ‘मुंबई झोपडपट्टी सुधार समिती'चे सभापती विजय नाहटा, माजी खासदार संजीव नाईक, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, योगेश कडुसकर, डॉ. राहुल गेठे, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड आणि महापालिकेचे सर्व कार्यकारी अभियंता आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रास्ताविकातून नवी मुंबईच्या विकासकामांचा धावता आढावा घेतला. नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दर्जेदार सुविधापुर्ती सोबतच शहराच्या नावलौकिकात भर घालणारे  ९०० कोटींचे विशेष प्रकल्प सद्यस्थितीत सुरु असल्याची माहिती देत नार्वेकर यांनी ११२९ कोटी रक्कमेच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपुजन होत असल्याचे सांगितले. यामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण, सुशोभिकरण, दळणवळण, परिवहन, शहर सुरक्षा, अग्निशमन, ऐतिहासिक वारसा जतन, वाचन संस्कृती वृध्दी, ज्येष्ठ नागरिकांप्रती आदरभाव दाखवणाऱ्या विविध सुविधा प्रकल्प आणि इमारती यांचा समावेश असल्याची माहिती दिली.

ऐरोली, सेवटर-१० येथे नियोजित छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा आणि ऐतिहासिक संग्रहालय शिलान्यास (१४ कोटी), घणसोली येथे पामबीच मार्गावर घणसोली-ऐरोली खाडीपुल बांधणे (४९३ कोटी), नमुंमपा क्षेत्र सीसीटीव्ही यंत्रणा-नमुंमपा मुख्यालयातील कमांड सेंटर लोकार्पण (१२६ कोटी), सीवुडस्‌ से.३८ येथील ज्येष्ठ नागरिक काळजी केंद्र इमारत लोकार्पण (४.१८ कोटी), अमृत योजना २.० अंतर्गत २९०.१३ कोटी रक्कमेच्या विविध सुविधा कामे, भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथे १५० दशलक्ष लिटर क्षमतेचे फिल्टर बेड बांधणे (५६.७१ कोटी), नमुंमपा क्षेत्रातील रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करणे (१३.८४ कोटी), नेरुळ सेवटर-३० येथील शाळा इमारत (११ कोटी), घणसोली सेवटर-१५ येथील शाळा इमारत (८५ कोटी), कोपरखैरणे सेवटर-१४नागरी आरोग्य केंद्र इमारत (३.६५ कोटी), ऐरोली सेवटर-३ येथील अग्निशमन केंद्र इमारत (११ कोटी), विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथील ग्रंथालय (४ कोटी), से.२२ तुर्भे विभाग कार्यालय इमारत (९ कोटी) आणि परिवहन उपक्रम, तुर्भे आगार प्रशासकीय इमारत (३.५० कोटी) अशाप्रकारे एकूण ११२९ कोटी रक्कमेच्या सुविधा कामांचे लोकार्पण आणि भूमीपुजन संपन्न झाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२७ गावातील अंधारात असलेले रस्ते येणार उजेडात