ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पश्चिम बंगालच्या संदेशखालीचे ठाण्यात पडसाद
ठाणे : पश्चिम बंगालमधील संदेशखालीमध्ये गेली दहा वर्षे महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराचे पडसाद ठाण्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ तेजस्विनी महिला समूहा अंतर्गत महिलांनी शुक्रवारी ठाण्यात जोरदार निदर्शने केली.यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ता मृणाल पेंडसे, वृषाली वाघुले तसेच जयश्री कुलकर्णी आदीसह संतप्त महिलांनी या प्रकरणांतील मुख्य आरोपी तृणमुल काँग्रेसचा शहाजहान शेख व त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करण्याची मागणी करून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना निवेदन दिले.
पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणामधील संदेशखाली या गावामध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने महिलांवर अत्याचार होत आहेत.आता विविध माध्यमातून हे वास्तव सर्वांपर्यत पोहोचले. आपल्याच भगिनींवर होत असलेल्या अत्याचारांचा घटना फक्त ऐकून शांत राहणे हे कोणत्याही संवेदनशील नागरिकाला शक्य नाही, या अस्वस्थतेतून अत्याचार ग्रस्त भगिनींच्या लढ्याला नैतिक पाठिंबा देण्यासाठी ही निदर्शने करत असल्याचे महिलांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील महिलांसोबतच सजग गृहिणी सहभागी झाल्या होत्या.
पश्चिम बंगालचे राज्यपाल तसेच केंद्रीय महिला आयोगाने दखल घेऊनही तेथील सरकार आणि पोलीस यंत्रणा या अत्याचाराला प्रतिबंध करण्याऐवजी त्यावर पांघरूण घातले जाते. हे निषेधार्ह आहे. तेव्हा या सर्व प्रकरणांतील मुख्य आरोपी शहाजहान शेख व त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी, तसेच या नराधमांना पाठीशी घालणारी पश्चिम बंगालची शासन यंत्रणा व पोलीस यंत्रणामधील संबंधित अधिकारी वर्गावरही कारवाई करावी. अशी मागणी महिला आंदोलकांनी केली.