सलमान खानवर हल्ल्याचा कट; चौकडी जेरबंद
नवी मुंबई : सुप्रसिध्द सिनेअभिनेता सलमान खान याच्यावर हल्ला करुन त्याची हत्या करण्याचा कट रचणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँग टोळीतील ४ आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. धनंजयसिंह तपेसिंग उर्फ अजय कश्यप (२८), गौरव विनोद भाटीया उर्फ न्हायी संदीप (२९), वस्पी मेहमुद खान उर्फ वसीम चिकना (३६) आणि झिशान झकरुल हसन उर्फ जावदे खान (२५) अशी या चौघांची नावे आहेत. सदर चौघांनी आणि या टोळीतील इतर सदस्यांनी पाकिस्तानातून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मागवून सलमान खानची हत्या करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार पोलिसांनी सलमान खानच्या हत्येचा कट रचणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.
बॉलीवुड मधील प्रसिध्द अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी देणारे लॉरेन्स बिष्णोई आणि गोल्डी ब्रार गँग मधील काही सदस्य पनवेल आणि कळंबोली परिसरात रहात असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना नोव्हेंबर २०२३ महिन्यात गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. तसेच सदर आरोपींनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊस, मुंबई बांद्रा येथील त्याचे घर तसेच सलमान खान शुटींग करीत असलेल्या ठिकाणी त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर रेकी केल्याचे आणि लवकरच त्यांच्या मारेकऱ्यांमार्फत त्याला जीवे मारणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. पोलिसांच्या पथकाने केलेल्या चौकशीत अजय कश्यप उर्फ धनंजय तपेसिंग, रॉकी शुटर, सतिशकुमार, सुखा शुटर, संदीप बिष्णोई उर्फ गौरव भाटिया, वसीम चीना, डोगर आणि इतर आरोपी सलमान खानला मारण्याचा कट रचत असल्याची महिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी एप्रिल महिन्यात या प्रकणात गुन्हा दाखल करुन आरोपी अजय कश्यप आणि गौरवा भाटिया यांना गुजरात मधून, वस्पी मोहम्मद चिकना याला संभाजीनगर येथून तर झीशान याला बंगळुरु येथून अटक केली होती.
त्यानंतर पोलिसांनी या चौकडीची चौकशी केली असता, आरोपी धनंजय तपेसिंग उर्फ अजय कश्यप लॉरेन्स बिष्णोई ग्रुपचा सदस्य असल्याचे तसेच त्याने पनवेल मधील सलमान खान याचा फार्म हाऊस, बांद्रा येथील घर तसेच फिल्मसिटी येथे रेकी केली असल्याचे तपासात आढळून आले आहे. तसेच त्याने आणि त्याच्या इतर साथीदारांनी सलमान खान याचे फार्महाऊस तसेच त्याचे येण्या-जाण्याचे मार्ग आणि त्याला ठार मारण्याविषयी पनवेल बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन परिसर येथे बैठका घेतल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. त्याचप्रमाणे अजय कश्यप आणि त्याचे इतर साथीदार ऑगस्ट २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत मुंबई, पनवेल, नवी मुंबई, पुणे, रायगड, गुजरात आणि कन्याकुमारी या वेगवेगळ्या ठिकाणी गेल्याचे देखील तपासात आढळून आले आहे.
आरोपी अजय कश्यप याचा मागील एका वर्षापासून अवैधरित्या शस्त्र तस्करीचे ठिकाण असलेल्या काश्मीर, गंगानगर, पाकिस्तान बॉर्डर, बिहार, सीवान, गोरखपूर नेपाळ बॉर्डर, तिरुनावल्ली आणि तामीळनाडू अशा भागात वावर असल्याचे देखील तपासात आढळून आले आहे. पोलीस चकमकीत ठार झालेला कुख्यात गँगस्टर आनंद पाल याची संघटना त्याची मुलगी चिनु चालवित असून तिची संघटना आणि बिष्णोई संघटना या एकमेकांना सहकार्य करीत असल्याचे तसेच चिनु देखील अजय कश्यप याच्या संपर्कात असल्याचे तपासात आढळून आले आहे.
हल्ल्यासाठी अत्याधुनिक हत्यारे चालविणाऱ्या शार्प शुटर्सची निवड...
सलमान खानवर हल्ला करण्यासाठी या टोळीने १८ वर्षाच्या आतील मुलांचा वापर करण्याची तयारी केली होती. तसेच अत्याधुनिक हत्यारे चालविणारे शार्प शुटर्स मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि गुजरात याठिकाणी तयार ठेवण्यात आले होते. त्यांना विदेशात बसलेल्या गोल्डी ब्रार, रोहित गोधारा आणि अनमोल बिष्णोई यांचे आदेश मिळाल्यानंतर ते सलमान खानवर हल्ला करणार होते. तसेच या कामासाठी गाडी पुरविण्याकरित जॉन नावाच्या व्यक्तीची निवड देखील करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर सर्वजण कन्याकुमारी येथे एकत्र जमल्यानंतर तेथून ते समुद्रमार्गे बोटीतून श्रीलंका येथे एकत्र जाणार होते. त्यानंतर त्यांना दुसऱ्या देशामध्ये पाठविण्याची सर्व व्यवस्था अनमोल बिष्णोई याने करुन ठेवल्याचे तपासात आढळून आले आहे.
यापूर्वीही सलमान खान याची रेकी...
आरोपी संदीप बिष्णोई उर्फ गौरव भाटिया आणि संपत नेहरा यांनी सलमान खान याची यापूर्वी रेकी केली होती. त्यावेळी ते मुंबई पासून काही किलोमीटर अंतरावर एका बिल्डींग मध्ये रहात होते. परंतु, पोलिसांना त्यांची खबर लागल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यामुळे संदीप बिष्णोई गुजरात मध्ये तर संपत नेहरा हैद्राबाद येथे पळून गेला होता. मात्र, संपत नेहरा याला हैद्राबाद येथे गुरुग्राम एसटीएफने पकडले होते. तर गौरव भाटिया पोलिसांच्या हाती लागला नव्हता. तेथून तो कच्छ भूज, राजस्थान आणि अहमदाबाद येथे अभिनेता सलमान खान याला मारण्याची वाट पहात होता. त्यासाठी त्याने ३ अत्याधुनिक हत्यारे देखील सोबत ठेवल्याचे तपासात आढळून आले आहे. सदरची अत्याधुनिक हत्यारे त्याने पाकिस्तान मधील डोगरकडून खरेदी केल्याचे तपासात आढळून आले आहे.
‘सोशल मिडीया'द्वारे मिळवली कटाची माहिती...
पनवेल पोलिसांनी सदर कटात सहभागी असलेल्या सदस्यांच्या व्हॉटस्ॲप ग्रुप आणि इतर सोशल साईटच्या माध्यमातून प्रवेश करुन मागील ५ ते ६ महिने त्यांच्या हालचालींवर, संभाषणावर वॉच ठेवला होता. या माध्यमातून पोलिसांना सलमान खानवर कशा पध्दतीने हल्ला करण्यात येणार आहे? कोण कट रचत आहे? कटात कोण कोण सहभागी आहेत? याची माहिती मिळाली. त्यांनतर पोलिसांनी या टोळीतील १४ सदस्यांवर गुन्हा दाखल करुन त्यापैकी ४ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी आता लॉरेन्स बिष्णोई, अनमोल बिष्णोई, संपत नेहरा आणि गोल्डी ब्रार, रॉकी शुटर, सतिशकुमार, सुखा शुटर, संदीप बिष्णोई उर्फ गौरव भाटिया, रोहित गोधरा, वसीम चीना, डोगर, शाहनवाज, सिंतुकुमार, जॉन, विशालकुमार, समीरकुमार, संदीप सिंग, रियाज उर्फ चंदू, कमलेश शाह उर्फ साह आणि इतर साथीदारांचा शोध सुरु केला आहे.