६ महिन्यामध्ये ‘नवी मुंबई मेट्रो'तून १९.६२ लाख नागरिकांचा प्रवास  

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु झाल्यानंतर गत ६ महिन्यामध्ये ‘मेट्रो'मधून तब्बल १९ लाख ६२ हजाराहुन अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची आकडेवारी ‘सिडको'ने जाहिर केली आहे. ‘नवी मुंबई मेट्रो'च्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, या मेट्रो मार्गावरील अपुऱ्या सुविधांमुळे ‘नवी मुंबई मेट्रो'तून नियमीत प्रवास करणारे प्रवाशी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो'ने मासिक पास, रिटर्न तिकीट आणि इतर सोयी-सुविधा सुरु कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.  

तळोजा नोड मधील नागरिकांना यापूर्वी तीन आसनी रिक्षा, एनएमएमटी बस सेवा आणि इको व्हॅन यामधून तळोजा ते बेलापूर असा प्रवास करावा लागत होता. मात्र, नवी मुंबई मेट्रो सुरु झाल्यामुळे तळोजा आणि खारघर मधील नागरिकांना अवघ्या १५ मिनिटांत कोणत्याही अडथळ्याविना बेलापूर ते तळोजा असा प्रवास करणे शक्य झाले आहे. त्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो'ला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

‘नवी मुंबई मेट्रो' मार्गावरुन नोव्हेंबर २०२३ ते एप्रिल २०२४ या सहा महिन्यांमध्ये तब्बल १९ लाख ६२ हजाराहुन अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची आकडेवारी ‘सिडको'ने समाजमाध्यमावर जाहिर केली आहे. ‘सिडको'तर्फे उभारण्यात आलेल्या ‘नवी मुंबई मेट्रो'ला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असला तरी अपुऱ्या सुविधांमुळे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून ‘नवी मुंबई मेट्रो' बद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

६ महिन्यापूर्वी सुरु झालेल्या ‘नवी मुंबई मेट्रो'चे तिकीट दर जास्त असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ‘मेट्रो'मध्ये अद्याप मासिक पास आणि रिटर्न तिकीटाची सुविधा नसल्यामुळे प्रवाशांना पुन्हा-पुन्हा तिकीट काढण्यासाठी जावे लागते. मेट्रो गारेगार असली तरी, प्लॅटफॉर्मवर पंखे नसल्यामुळे ‘नवी मुंबई मेट्रो'ची वाट पाहत बसलेल्या प्रवाशांना सध्याच्या उष्ण वातावरणात बसावे लागत आहे. त्याचप्रमाणे ‘मेट्रो'च्या स्थानकावर पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील केली गेलेली नाही.  

अशा अपुऱ्या सुविधांमुळे ‘नवी मुंबई मेट्रो'मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ‘सिडकोे'ने प्रवाशांसाठी तत्काळ सदर सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे. सेवावाढीमुळे ‘नवी मुंबई मेट्रो'वरील प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल, असेही या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे.  

रिक्षा चालकांच्या लुटमारीला चाप...

‘नवी मुंबई मेट्रो'च्या पेंधर ते बेलापूर या मार्गावरील ११ स्थानकांमधून दररोज ‘मेट्रो'च्या ६५ अप आणि ६५ डाऊन फेऱ्या होत आहेत. या सेवेमुळे रिक्षातून आणि इको व्हॅन मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. तर एनएमएमटी बसचे तिकीट दर ‘मेट्रो'पेक्षा कमी असल्याने या बसच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झालेला नाही. मात्र, बेलापूर ते तळोजा या पल्ल्यासाठी विनामीटरने बेकायदा भाडे आकारणाऱ्या ३ आसनी रिक्षा चालकांच्या लुटमारीला चाप बसला आहे.

‘नवी मुंबई मेट्रो'चे तिकीट दर जास्त असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडतील असे हवेत. या ‘मेट्रो'चा प्रवास गारेगार आणि सुखकर असला तरी ‘मेट्रो'मध्ये मासिक पासची सुविधा नाही. रिटर्न तिकीटाची सुध्दा सुविधा नाही. पलॅटफॉर्मवर पंखे नाहीत, पाणी पिण्याची सुविधा नाही. त्यामुळे ‘सिडको'ने या सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. -अक्षय कांबळे, प्रवासी.


नवी मुंबई मेट्रो सेवा सुरु होऊन ६ महिने उलटून गेले आहेत. अद्याप ‘नवी मुंबई मेट्रो'मध्ये मासिक पासची सुविधा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता तरी ‘नवी मुंबई मेट्रो'मध्ये मासिक पासची सुविधा सुरु करावी. किती दिवस प्रवाशांनी स्टोअर व्हॅल्यु पास वापरायचा? - योगेश लाटे, प्रवासी.  


‘नवी मुंबई मेट्रो' ६ महिन्यातील प्रवासी आकडेवारीः

महिना                     प्रवासी संख्या  
नोव्हेंबर २०२३           २,००,०२३  
डिसेंबर २०२३            ३,७७,०१०
जानेवारी २०२४          ३,६०,५३१
फेब्रुवारी २०२४           ३,८५,०३२
मार्च २०२४               ३,०७,३८०
एप्रिल २०२४             ३,०९,१३२
एकूण                    १९,६२,०८५ 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबईमध्ये ५२७ इमारती धोकादायक