प्रितम म्हात्रे यांना २ मित्रांकडून बर्थ-डे गिपट
पनवेल : पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाला त्यांचे सहकारी मंगेश अपराज आणि भारत भोपी यांनी २० विद्यार्थी शैक्षणिक वर्षासाठी दत्तक घेऊन त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे मंगेश अपराज आणि भारत भोपी यांनी प्रितम म्हात्रे यांना दिलेल्या अनोख्या गिपटचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेली २३ वर्षे काम करीत आहे. माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या शिकवणीनुसार आम्ही प्रितम म्हात्रे यांच्या सामाजिक आणि लोकोपयोगी कार्यात एक खारीचा वाटा उचलत आहोत. वाढदिवसाच्या काही दिवस आधीच पनवेल तालुक्यातील रिटघर येथील ‘रयत शिक्षण संस्था'च्या श्री भैरवदेव विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी २० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची समस्या सांगितली. या समस्येवर प्रितम म्हात्रे तोडगा काढतील, असा मी मुख्याध्यापकांना शब्द दिला. मात्र, मी आणि भारत भोपी यांनी परस्पर २० विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेऊन प्रितम म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेऊन तो अंमलात देखील आणला, याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मंगेश अपराज यांनी सांगितले.
दरम्यान, प्रितम म्हात्रे यांनीही आपल्या सार्वजनिक जीवनात वावरताना सामाजिक व्यवस्थेचे भान ठेवत सामाजिक बांधिलकी जोपासत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यात शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा आदि क्षेत्रातील गरजवंतांना सढळ हस्ते विविध स्तरावर मदतीचा हात दिला आहे. गेल्यावर्षी खालापूर तालुक्यात इर्शाळगड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन केले आहे. तसेच त्यांचा शैक्षणिक खर्चही उचलला आहे. प्रितम म्हात्रे यांचा वसा त्यांच्या मित्रांनीही जोपासला असल्याने समाधान व्यक्त होत आहे.
माझ्या वाढदिवसाला माझ्या सहकाऱ्यांनी २० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या भार उचलला आहे, याचा मला खूप आनंद आहे. खऱ्या अर्थाने मला वाढदिवसाला मिळालेले ते एक उत्तम गिपट म्हणावे लागेल. माझे वडील जे. एम. म्हात्रे यांनी दिलेल्या समाजकार्याच्या शिकवणीनुसार मी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना माझ्यासोबतचे सहकारी देखील त्याच शिकवणीनुसार कार्य करीत आहेत, निश्चितच अभिमानास्पद आहे. -प्रितम म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते-पनवेल महापालिका.