मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
‘ठाणे परिवहन'चा ६९४.५६ कोटींचा अर्थसंकल्प सादर
ठाणे : ‘ठाणे महापालिका परिवहन उपक्रम (टीएमटी)'चा सन २०२४-२५ या वर्षांचा ६९४.५६ कोटींचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी वागळे आगारात झालेल्या ‘परिवहन समिती'च्या बैठकीत सभापती विलास जोशी यांना सादर केला. कुठल्याही प्रवासी भाड्यामध्ये वाढ न करता, ‘टीएमटी'च्या १८६ इलेक्ट्रिक नवीन बसेस, उत्पन्न वाढीसह परिवहन उपक्रमाला आवश्यक असलेल्या ४५२.४८ कोटीच्या अनुदानाच्या अपेक्षांचा अर्थसंकल्प सादर झाला आहे.
दरम्यान, ‘टीएमटी' बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडाची रक्कम दुप्पट करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सदर अर्थसंकल्पावर सूचना-हरकती यावर येत्या १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ‘परिवहन समिती'च्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर ‘परिवहन'चा अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे.
‘परिवहन उपक्रम'च्या सन २०२४-२०२५ या वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रशासनाने कुठलीही प्रवास दरवाढ सुचविलेली नसून तिकीट दर ‘जैसे थे' ठेवण्यात आलेले आहेत. तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून शून्य प्रदुषण असलेल्या बसेस ‘टीएमटी'च्या तापयात वाढविण्याचा मनोदय व्यक्त करण्यात आलेला आहे. येत्या २ वर्षात प्रदुषणमुक्त १८६ नवीन बसेसचा समावेश करण्याचे प्रस्तावित आहे. तर दुसरीकडे ठाणे मधील वाढती लोकसंख्या आणि दळणवळणाच्या साधनांचा विचार करता लोकसंख्या नुसार ‘ठाणे परिवहन'ला ७९३ बसेसची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत ‘टीएमटी' ४४६ बसेसच्या दिमतीवर ठाणेकरांना सुखकर परिवहन सेवा देत आहे. तसेच ‘परिवहन उपक्रम'मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून त्यापोटी आणि इतर थकीत वेतनासह फरकाच्या रवकमेसह एकूण थकीत देणी यासाठी २३.२२ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. वाहन दुरुस्ती-देखभालीसाठी ९.४२ कोटी, डिझेल-सीएनजी साठी २१.८५ कोटी, पुढील वर्षी भराव्या लागणाऱ्या प्रवासी करासाठी ८.२० कोटी, बालपोषण अधिकार १.२० कोटी, वाहनांचा विमा २ कोटी रक्कमेचा अंतर्भाव सदर अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे.
अनुदानाची मागणी प्रस्तावित...
‘ठाणे परिवहन उपक्रम'ने राज्य सरकारकडे १०० कोटी रुपयांचे अनुदान मागितले आहे. यामध्ये कर्मचाऱ्याच्या देणी देण्यासाठी ८६ कोटी, तर नवीन डेपो उभारणीसाठी १४ कोटी आणि इतर डागडुजीसाठी असे एकूण १०० कोटी रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. महापालिका कडून देखील ४५२.४८ कोटी रुपयांचे अनुदान मिळावे अशी मागणीही आयुक्तांकडे करण्यात आलेली आहे. यामध्ये वेतन खर्च, पेन्शन, वैद्यकीय भत्ता, रजा प्रवास भत्ता, सेवानिवृत्ती कर्मचारी थकबाकी, पुरवठा दारकांची देयके आदींच्या खर्चाचा समावेश आहे.
तिकीट दर ‘जैसे थे'...
अर्थसंकल्पामध्ये प्रवासी भाड्यापोटी सध्या अस्तित्वात असलेल्या बस आणि नव्याने दाखल होणाऱ्या बसेस द्वारे १५८.४० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. जाहीरात, पोलीस ग्रॅन्ट आणि महापालिकेकडून दिलेल्या सवलती पोटी दिलेले अनुदान असे अपेक्षित उत्पन्नात धरण्यात आले आहे. तर जेष्ठ नागरिक ५० टक्के, दिव्यांग १०० टक्के, विद्यार्थी ५० टक्के, ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिक, स्वांतत्र्य सेनिकांची विधवा पत्नी आणि सोबत सह प्रवासी, तसेच इतरांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळे ‘परिवहन उपक्रम'वर ताण पडणार आहे. त्याची भरपाई म्हणून अनुदानातून मिळावी यासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे.
२०२४ अखेर १४३ कर्मचारी होणार सेवानिवृत्त...
‘ठाणे परिवहन उपक्रम'मध्ये कार्यरत असलेले तब्बल १४३ कर्मचारी सन-२०२४ या वर्षाच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. तर डिसेंबर २०२३ अखेर ‘उपक्रम'मधून १,०३३ कर्मचारी सेवानिवृत झालेले आहेत. त्यामुळे या सेवानिवृत झालेल्या कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी ‘परिवहन उपक्रम'ला ५२.५८ कोटी रुपये खर्च येणार आहे. तसेच ‘सातवा वेतन आयोग'च्या अंमलबजावणीमुळे परिवहन कर्मचारी यांच्या थकीत देणीसाठी १२३.८८ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
फुकट्या प्रवाशांना दंड आकारणी २०० रुपये...
यापूर्वी ‘टीएमटी' बसेसमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंडात्मक कारवाईपोटी १०० रुपये वसूल जात होते. मात्र, या दंड रवकमेत वाढ करुन ती २०० रुपये प्रस्तावित करण्यात आली आहे.