उद्या दहावी परीक्षाचा ऑनलाईन निकाल

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षाचा निकाल उद्या २७ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात येणार आहे.

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ'च्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर उद्या२७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर केला जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते

1) https://mahresult.nic.in

२)  http://sscresult.mkcl.org

3)  https://sscresult.mahahsscboard.in

४)  https://results.digilocker.gov.in

५)  https://results.targetpublications.org

६)  https://www.tv9marathi.com


मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण अधिकृत संकेतस्थळांवरुन उपलब्ध होणार असून, गुण माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांना https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार आहे.

निकालाबाबतचा अन्य तपशील

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मुल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती आणि सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी २८ मे ते ११ जून २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येणार आहे. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/ Credit Card/UPI/ Net Banking  याद्वारे भरता येणार आहे.

मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून, छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मुल्यांकनाच्या कार्यपध्द्‌तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे असेल, त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च २०२४ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार  (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) पुरवणी परीक्षेसाठी पुर्नपरिक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ३१ मे २०२४ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणारआहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे र्निगमित करण्यात येणार आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

‘दहावी बोर्ड'चा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९५.८१ टक्के