‘सिडको'द्वारे एपीएमसी मधील अतिक्रमणाला अभय?
वाशी : सिडको अतिक्रमण विभागामार्फत नवी मुंबई शहरातील ‘सिडको'च्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी फेब्रुवारी महिनाभराचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मात्र, या कारवाईतील पुढील दिवसात एपीएमसी पोलीस ठाणे अंतर्गत कारवाई दिसत नसल्याने या परिसरातील मोकळ्या भूखंडावरील मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणाला ‘सिडको'ने अभय दिले आहे का?, असा सवाल तुर्भे मधील स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सिडको तफे वाशी सेक्टर-१९ एफ मधील भूखंड क्रंमांक-१ एपीएमसी निगडित कामाकरिता आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र, मागील कित्येक वर्षापासून सदर भूखंड मोकळा असल्याने या भूखंडावर भूमाफियांकडून अतिक्रमण केले जात आहे. याआधी याठिकाणी झोपड्या बांधून विकल्या जात असल्याच्या आणि त्यांच्याकडून पाण्याचे पैसे उकळले गेल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.त्यामुळे या ठिकाणी अल्पावधीतच मोठी झोपडपट्टी उभी राहिली आहे. झोपडपट्टी वाढल्याने अंमली पदार्थ विक्री होत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत दिसून आले आहे. तसेच रात्री देहविक्रीचा व्यवसाय जोरात सुरु असल्याचा आरोप होत आहे. याचा नाहक त्रास वाशी सेक्टर-२६ मधील महिला, लहान मुले-मुली आणि स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमणावर कारवाई करावी म्हणून स्थानिक नागरिकांनी नवी मुंबई महापालिका, सिडको तसेच पोलीसांकडे वारंवार तक्रारी करुन देखील ठोस कारवाई होत नसून फक्त आश्वासनावर बोळवण केली जाते. दुसरीकडे नवी मुंबई शहरातील ‘सिडको'च्या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी ‘सिडको'ने फेब्रुवारी महिन्यात कारवाई मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची आखणी केली आहे.त्यामुळे ‘सिडको'ने दिलेले आश्वासन आणि कारवाईची आखणी पाहता सदर भूखंडावरील अतिक्रमणावर कारवाई केली जाईल, अशी आशा वाशी सेक्टर-१९ येथील रहिवाशांना होती. मात्र, ‘सिडको'च्या आगामी कारवाईत एपीएमसी पोलीस ठाणे अंतर्गत एकही कारवाई दिसत नसल्याने सदर मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणाचा ‘सिडको'ला विसर पडला आहे का?, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करीत आहेत.
वाशी सेक्टर-१९ एफ मधील भूखंड क्रमांक-१ या भूखंडावरील अतिक्रमण बाबत आलेल्या तक्रारी बाबत कारवाई करण्यासाठी ‘सीईओं'शी चर्चा करुन पुढील कार्यवाही केली जाणार आहे. - संजय जाधव, मुख्य अतिक्रमण बांधकाम नियंत्रक - सिडको.