‘अंतिम श्वासात राही मराठी'

खारघर : संत ज्ञानेश्वर यांचे ‘माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके', कवियित्री बहिणाबाई यांच्या ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर', कवी कुसुमाग्रज यांची ‘अरे घर देता का घर', या कविता हिहिणाऱ्या थोर व्यक्तींच्या काव्याचे महत्व तरुण पिढीला समजावे, या उद्देशाने खारघर मधील ‘मी मराठी, माझी मराठी मंडळ' तर्फे कवितेच्या ओळींचे फलक लावून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला डॉ. सचिन खोडदे, शिवाजी पाटील, मधुकर भोसले, कल्पना भोसले, ‘मी मराठी, माझी मराठी मंडळ'चे अध्यक्ष कृष्णनाथ कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

 राज्यात १ मे रोजी कामगार आणि महाराष्ट्र दिन मोठया उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर, येणाऱ्या तरुण पिढीला ‘महाराष्ट्र दिन'चे महत्व समजण्यासाठी ‘मी मराठी, माझी मराठी मंडळ' द्वारे खारघर मधील शिल्प चौकात महाराष्ट्र दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या कार्यक्रमात विविध कवींच्या कवितेतील ओळींचे फलक लावण्यात आले होते. संत ज्ञानेश्वर यांचे ‘अमृतातेही पैजा जिंके', संत तुकाराम यांचे ‘भले तरी देवू कासेची लंगोटी', दिनानाथ मंगेशकर यांचे ‘शुरांनी वंदिले', या गजलेल्या ओळीचे पृष्ठावर लिखाण करुन सदर फलक चौकात लावण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी कामगार दिन निमित्त लावण्यात आलेले शुभेच्छा देणारे फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेते होते.

मराठी भाषा जगविलेल्या थोर व्यवतींचा मराठी लोकांनाच विसर पडत चालला आहे. त्यामुळे  येणाऱ्या युवा पिढीला महाराष्ट्र आणि कामगार दिन या दिवसाचे महत्व पटवून देण्यासाठी खारघर मध्ये ‘मी मराठी, माझी मराठी मंडळ', तर्फे ‘महाराष्ट्र दिन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला, असे कृष्णनाथ कुलकर्णी यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विहीरींनी तळ गाठल्याने भीषण पाणी टंचाई