मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
शाळांसमोरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांचा पुढाकार
मुख्याध्यापकांसह पदाधिकाऱ्यांना बैठकीतून मार्गदर्शन
नवी मुंबई : शाळा-कॉलेज भरताना आणि सुटताना रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी कोपरखैरणे वाहतूक शाखेने कोपरखैरणे आणि घणसोली विभागातील सर्व शाळा, महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना शाळा-महाविद्यालयासमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोपरखैरणे आणि घणसोली भागातील सर्वच शाळेत विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी स्कुल बस, स्कुल व्हॅनची सुविधा आहे. काही पालक मुलांना स्वतः शाळेत घेऊन येतात आणि जातात. त्यासाठी दुचाकीसह चारचाकी वाहनांचा वापर केला जातो. मात्र, शाळेसमोर वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने पालक अथवा स्कुल बस-व्हॅन चालक जागा मिळेल, तिथे वाहने उभी करतात. त्यामुळे शाळा-कॉलेज परिसरात वाहतूक कोंडी होऊन अनेकांचा खोळंबा होता.
दरदिवशी सकाळी शाळा, कॉलेज भरताना आणि दुपारी सुटताना शाळेसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा इतर वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी ७ जुलै रोजी कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या वतीने सेंट मेरी शाळेतील सभागृहात कोपरखैरणे तसेच घणसोलीतील सर्व शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी शाळेसमोर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पालकांची तसेच स्कुल व्हॅन, स्कुल बस चालकांची मिटींग घ्ोण्याबाबत सूचित करण्यात आले. जवळ जवळ असलेल्या शाळांची भरण्याची आणि सुटण्याची वेळ सारखी असलेल्या शाळांनी आपल्या वेळेत थोडा फार बदल करण्याचे देखील सूचित करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेकडून प्रत्येक शाळेसमोर शाळा सुटताना आणि भरताना वाहतूक पोलीस तैनात करण्याचे आश्वासन देण्यात आले.
सदर बैठकीत वाहतूक पोलिसांनी शाळांना येणााऱ्या अडचणी देखील जाणून घेतल्या. तसेच सर्वांनी वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबत प्रबोधन करण्यात आले. याशिवाय वाहनावर असलेल्या दंडाची रक्कम कोपरखैरणे वाहतूक शाखेत भरुन घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावर योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले.
कोपरखैरणे आणि घणसोलीतील शाळा सुटताना आणि भरताना शाळांसमोरील रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊन त्याचा इतर वाहन चालकांना त्रास होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी कोपरखैरणे आणि घणसोलीतील सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येऊन त्यांना उपायोजना करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आले. - विश्वास भिंगारदिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक - प्रभारी कोपरखैरणे वाहतूक शाखा.