वाशीतील बालनाट्य अभिनय कार्यशाळेची सांगता

नवी मुंबई : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, संत शिरोमणी कला मंच नवी मुंबई आणि नवी मुंबई बाल रंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते १४ मे २०२४ या कालावधीमध्ये वाशी मधील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे बालनाट्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या बालनाट्य अभिनय कार्यशाळेचा समारोप १४ मे रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे करण्यात आला.

या बालनाट्य कार्यशाळेत नवी मुंबईतील एकूण ४० बालकलाकारांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत मार्गदर्शक ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे यांनी नाटकाच्या विविध अंगाची ओळख, नाट्यछटा, द्विपात्री बालनाट्य, बाल विश्वाचे विविध विषय त्यावर संवाद, गटचर्चा सादरीकरण अशा विविध पैलुंचा अभ्यास हसत खेळत झाला. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘निश्चय केला नंबर पहिला...' अशी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी बालनाटिका अतिशय सुंदररित्या सादर केली.

उंदीर झालेल्या बालकलाकारांनी प्रेक्षकांना स्वच्छतेबाबत चांगला संदेश दिला. त्याचबरोबर २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या निमित्ताने मतदान जनजागृती मतदान हक्क यावरही विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना आवाहनापर बालनाटिकेतून जनजागृतीचा संदेश दिला. तसेच विनोदी बालनाट्य राणीचा लाडू श्रीमंत माणसे प्राण्यांवर अति लाड करतात, त्याचे छानसे उदाहरण म्हणजे राणीचा लाडू हेही बालनाट्य प्रेक्षकांना वेगळाच संदेश देऊन गेले.

या बालनाट्य अभिनय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी नेत्रतज्ञ डॉ. प्रशांत थोरात, सुप्रसिध्द रांगोळीकार महादेव गोपाळे, पालक प्रतिनिधी सौ. अर्चना खरात, तबला-ढोलकी विशारद स्वप्निल भुवड, अभिनेते सुरेश रासकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी बनकर, निर्मिती सूत्रधार कुमारी प्रारंभी पालकर, प्रकाश योजना कुमारी श्रेया चव्हाण, संगीत-संयोजन सौरभ धुमाळ या माजी विद्यार्थ्यांनी केले. मार्गदर्शक जेष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे यांनी सर्वांचे आभार मानले. दरम्यान, पालकांनी सदर कार्यशाळेच्या नियोजनाबद्दल आणि विद्यार्थ्यांचे सादरीकरण बद्दल कौतुक केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोकण भवन येथे सोशल मिडीया-आधुनिक सुरक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न