मतदान हक्क असून बेदखल केल्यास शिवकाळात काय झाले असते?

देशाने, घटनेने, आणि संविधानाने दिलेलं नैतिक कर्तव्य ज्यांनी पार पाडले नसते तर, कदाचित महाराज यांनी जाहीर चौकात, चाबकाचे फटके देत, औकात दाखवत कदाचित उलटेही टांगले असते. राष्ट्रीय कर्तव्य जर आपण पार पाडत नसू तर आपणास आपल्याच शासन प्रणालीवर टीका करण्याचा अधिकार नाही.

खरं तर, महाराज हे १७ व्या शतकात देखील जगाला पाहिले मंत्रिमंडळ, खात्यानुसार मंत्री, त्यांच्यावर पंतप्रधान पद निर्माण करणारे पहिले लोकाभिमुख राजे होते, लोकांसाठी सारे काही करत असताना, जनभावना ही मनभावना समजून महाराज हे आपले काम करत आणि त्यातून एखादा मंत्री,सेनापती, सैनिक, योद्धा हादेखील सर्वसामान्य मावळा, शेतकरी आणि गावकीची तक्रार आल्यास महाराज यांच्या रोषास बळी पडत असत.

 आज विचार असा आहे, जर लोकशाहीप्रधान या देशात लोकांनी मतदान केले नसते तर महाराज यांनी त्यांना काय केलं असतं? तर मला वाटतं, देशाने, घटनेने, आणि संविधानाने दिलेलं नैतिक कर्तव्य ज्यांनी पार पाडले नसते तर, कदाचित महाराज यांनी त्याचा जाहीर चौकात, चाबकाचे फटके देत, औकात दाखवत कदाचित उलटेही टांगले असते. राष्ट्रीय कर्तव्य जर आपण पार पाडत नसू तर आपणास आपल्याच शासन प्रणालीवर टीका करण्याचा अधिकार नाही. एखाद्या गावात किंवा प्रांतात चांगलं केल्यावर महाराज त्यास सोन्याचे कडे, पालखीचा मान, एखादं शाल पांगोटे देऊन आगत स्वागत करत, कधी तर दवंडी देवून, डफ ताशा बडवत, महाराज तरुणांना घडवत असतं. आज महाराज असते तर, त्या गावाला सन्मानित केले असते, जिथं मतदान पूर्ण टक्के झाले त्यांनाही महाराज यांनी सन्मानित केलं असते, ज्यांनी काहीही न घेता, पिता, देता मतदानास प्रोत्साहित केलं असतं.

     एकतर शिवराय आणि तत्व यासाठी तडजोड होऊ शकत नाही, आधी स्वराज्य स्थापन केले आहे ते काही शोभेसाठी नसून त्यामागे असणारा रक्तरंजित इतिहास हा कारणीभूत असतो. स्वराज्य हे काही नेल कट्टर, चाकू, सुऱ्या, खंजीर यांच्या धारीवर मिळत नसून, त्यासाठी धारदार अशी तलवार चालवावी लागते. काही वेळा दोन ते तीन पिढ्या त्या साठी खस्ता होत फस्त झालेल्या असतात. इतकं काही करुन मिळाले ते स्वातंत्र्य नावाचे सौभाग्य अलंकार जर आपणास जपता, राखता येत नसेल तर आपली लायकी ही नालायकीची सावली आहे, हे सिद्ध होते. मतदान हक्कासाठी, कर्तव्य म्हणून, एक राष्ट्र कार्य म्हणून आपण त्यात भाग घेत काम केले पाहिजे, जो पर्यंत ते आपणाकडून होत आहे, तोपर्यंत आनंद आहे, मात्र ते जर निभावता येत नसल्यास, छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर हया लोकांना स्वराज्याचे दुश्मन समजून, त्यांचे वतन, नोकरी, शासकीय फायदे, सवलती आणि सर्व फुकट गोष्टीवर कर लावत, तमाम मतदान न करणाऱ्या लोकांना स्वराज्याचे मारेकरी म्हणून जाहीर करून अपमानित करत हुसकावून लावले असते.

       म्हणून, महाराज यांचे नाव घेत आहोत, त्यांच्या नावाने सत्ता मिळवत आहात, तर मतदान करा, त्यासाठी काही पैसा, अडका, प्रलोभने यात न अडकवता स्वतःला अडकित्यातील सुपारी करून घेऊ नका, कारण आपल्या मताची किंमत करण्याची हिंमत कुणास होणार नाही, असे शिवकार्य करा, स्वतःला मतदान मावळा समजा आणि उद्याचे तोरण किंवा मरण धोरणाचे आपणच कर्तेधर्ते व्हा! - प्रा.रविंद्र पाटील 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

  जगावेगळी आई?...