जगावेगळी आई?...

जगावेगळी आई?  हो! प्रत्येक स्त्री ही जगावेगळी आई असते. कारण मातृत्व सहजासहजी कोणाला मिळत नसते. कुणी लग्न झाल्यानंतर एका वर्षात आई बनते तर कुणाला अकरा वर्ष, दहा वर्ष, पाच वर्ष औषधोपचार करून खूप प्रयत्नानंतर आई बनण्याचं सुख त्या स्त्रीला मिळतं. आपण आई होणार आहोत या कल्पनेनेच ती स्त्री खुप खुश झालेली असते. तिला आपण या जगात खूप भाग्यवान आहोत, असे वाटू लागते. मग हे सुख अनुभवताना किती त्रास वेदना होत असतात, हे तिलाच माहिती असते पण तरीही ती देखील येणाऱ्या नाजूक पावलांवर लक्ष ठेवून असते आणि त्यामध्ये ती तिच्या वेदना विसरते.

 प्रत्येक स्त्रीला पहिल्या महिन्यापासून ते प्रस्तुती होईपर्यंत वेगवेगळे त्रास होत असतात. प्रत्येकीचा अनुभव वेगळा असतो. प्रत्येकीचे डोहाळे वेगळे असतात. कोणत्याही दोन गर्भिणी स्त्रीयांचे डोहाळे एकसारखे कधीच नसतात. म्हणूनच ती एक जगावेगळी आई असते.  लग्न झाल्यानंतर प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आई होण्याच आणि जेव्हा तिला समजते की, मी आई होणार आहे, तेव्हा ती मनातूनच विणकाम करायला सुरुवात करते. मुलगा असो किंवा मुलगी असो मी त्याला किंवा तिला या जगातील सर्व सुख देणार, त्याचे सर्व हट्ट पुरवणार. मग त्यासाठी मला कितीही कष्ट करावे लागले, कितीही त्रास सहन करावा लागला, तरी मी तो सहन करेन आणि माझ्या लेकराला हवे ते सुख देईल आणि ती तसे करते पण बरं का!

गर्भारपणात पहिले तीन महिने तर तिला आपल्याला काय होत आहे? आपल्या बाळाला काय पाहिजे? हे समजण्यातच जातात. जसा बाळाचा आकार गर्भामध्ये वाढत जात असतो, तसतशा स्त्रीला वेदना होत असतात, वेगवेगळ्या जाणिवा होत असतात. बाळ जसा आकार घेत असतं, तसं स्त्रीच्या देखील शरीरामध्ये वेगवेगळे बदल होत असतात. ते काही बदल ती स्त्री स्वीकारत असते, तर काही बदल नको नकोसे वाटत असतात. पण त्या एका सुखासाठी ती सगळं सहन करण्यास तयार असते. मग यामध्ये तिला साथ हवी असते, ती तिच्या कुटुंबाची, तिच्या पतीची आणि ती तिला मिळतदेखील असते. तिचे सगळे हट्ट, सगळे डोहाळे पुरवले जात असतात, पण तरी देखील ती मनातून थोडी दुःखी, थोडी आनंदी असते. डॉक्टर म्हणत असतात हार्मोन (संप्रेरके) बदल होत असतात. त्यामुळे बाईच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. ते प्रसूती होईतोपर्यंत होत असतात.

 प्रसूती झाली की, बाईचा नवीन जन्म असतो. तिने जन्म दिलेल्या बाळाचाच नाही तर त्या बाईचा स्वतःचा देखील नवीन जन्म असतो. तिने स्वतःने ज्या गोष्टी केलेल्या नसतात, त्या तिला कराव्या लागतात. आईपण येते. अल्लड असणारी मुलगी अचानकपणे जबाबदार होऊ लागते. अचानकपणे दिवस-रात्र जागून आपल्या बाळाची काळजी घेत असते. हे सर्व करत असताना तिला त्रास होत असतो. झोप पूर्ण होत नसते, त्यामुळे शरीर थकते, चिडचिड वाढते, लठ्ठपणा आलेला असतो. पण ती बाळाला पुरेसे दूध मिळण्यासाठी त्या लठ्ठपणाकडे पण लक्ष देत नाही. स्वतःचे शरीर जे आधी असते, त्यापेक्षा दुप्पट-तिप्पट वाढलेले असते. पण तिचं एकच लक्ष असतं की माझं बाळ कसं सदृढ आणि निरोगी राहील.

मात्र हे सर्व करत असताना काही कुटुंबामध्ये त्या स्त्रीला पुरेपूर पाठिंबा मिळत असतो. पण काही कुटुंबामध्ये तिच्या या जाड झालेल्या शरीराला नावे ठेवली जातात तू लठ्ठ झालेली आहेस. जरा हालचाल कर, नुसते बसून राहतेस, काहीतरी काम कर, म्हणजे जरा बारीक होशील.

पण हे बोल तिला का बरे दिले जातात? तिच्या शरीराला नावे ठेवण्यापेक्षा, तिने एक नवीन जन्म दिलेला आहे आणि स्वतःचा देखील नवीन जन्म झालेला  आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.  एका जीवाला जन्म दिलेला आहे, त्यावेळी  तो तिला असह्य वेदना होत असतात आणि त्या तिने सहन केलेल्या असतात आणि सर्वांनाच बाबा, आजी, आजोबा, मावशी, काका, काकी, मामा, मामी इतर कोणतेही प्रत्येकाला हवे असणारे नाते तिने निर्माण केलेले आहे; तरीपण तिला हे बोल का?

तू जगावेगळी आई आहेस का? सर्व आया जसे घरातील काम करून, बाहेरील काम करून, मुलाला सांभाळून संसार करतात तसे तुला का जमत नाही. तुला घरातील, बाहेरील तसेच बाळाचे देखील करता आले पाहिजे, दुसरं कोण करेल अशी अपेक्षा ठेवायची नाही, हे सगळं स्वतःच्या स्वतः तुला करता आले पाहिजे. अरे! पण प्रत्येकाचं शरीर हे वेगळे असते, प्रत्येकाची सहन करण्याची क्षमता वेगळी असते. प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. प्रत्येक स्त्रीला दुसरी स्त्री जे काम करेल ते तिला देखील जमेल असे नसते, कारण प्रत्येक स्त्री ही जगा वेगळी आईच असते. कारण बाळ गर्भामध्ये असल्यापासून आई त्याला संस्कार देत असते. त्याच्याशी गप्पा मारत असते. प्रत्येकाचे स्वभाव समजावून सांगत असते. हे सगळं ती करत असताना बाकी आपण कुठे असतो कुठेच नाही. त्यामुळे बाळ जन्माला आल्यानंतर बाळ नुसते हसले किंवा त्याच्या चेहऱ्यावरील हावभावावरून सुद्धा आईला समजते की, आपल्या बाळाला काय पाहिजे, त्याला काही त्रास होत आहे, की भूक लागली आहे, की अजून काही. हे आपण जितकं सांगू शकत नाही तितकं ती आईच सांगते. जरी ती आई असली तरीही प्रत्येक आई ही जगावेगळीच असते.

 या जगावेगळ्या आईचं एकच म्हणणं असतं.. माझा मुलगा कर्तुत्वान धाडसी बनावा. माझा मुलगा श्री राम प्रभूप्रमाणे एकनिष्ठ असावा. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे धाडसी असावा. माझी लेक झाशीची राणी प्रमाणे धाडसी, तसेच जिजाऊ मातेप्रमाणे प्रेम करणारी असावी. माझ्या मुलामध्ये किंवा मुलीमध्ये सत्वगुण ठासून भरलेला असावा आणि ते सगळं देण्यासाठी त्या आईची धडपड सुरू असते. समाजामध्ये माझं मूल कसं उंच भरारी घेईल हे तिला बघायचे असते आणि त्यासाठी साथ हवी असते, ती तिला तिच्या कुटुंबाची. कुटुंबाची जरी साथ नसेल, तरी एकटी आईसुद्धा त्या मुलाला उत्तमरीत्या घडवते. जसे तिला जमेल तसे म्हणूनच तर ती आई जगावेगळी आई असते.

पहिल बाळ असून देखील जेव्हा तिला समजते की आपल्याला दुसरे बाळ होणार आहे, तेव्हा देखील ती पहिल्यांदाच आई होणार आहे, असे जगत असते. कारण पहिल्या वेळेला जो त्रास तिने अनुभवलेला असतो, त्यातनं ती शिकते आणि दुसऱ्यांदा देखील जोमाने तयार होते. नवीन जगावेगळी आई बनण्यास तयार होते. परत नवीन अनुभव घ्यायला सज्ज होते. आणि ती आईच नाही तर तिचं कुटुंब देखील ही नवीन जबाबदारी घ्यायला तयार होते. म्हणूनच या आईला जगावेगळी आई असे म्हटले जाते. या जगावेगळ्या आईला आणि जगातील प्रत्येक स्त्रीला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा! - सौ. निवेदिता सचिन बनकर - नेवसे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 का होते कमी मतदान!