‘इतिहास छत्रपतींचा वाचण्यासाठी वाचला पाहिजे!'

महाराज यांचा इतिहास हा का वाचावा? तर..जीवन तर कुणीही जगतोय, मात्र जीवनाची पंढरी, आळंदी, जेजुरी होण्यासाठी, जीवनाचा रायगड, शिवनेरी, राजगड, तोरणा होण्यासाठी आपण महाराज यांचा कार्याचा धगधगता अंगार यांचा शृंगार घ्ोतला पाहिजे. इतिहास जिवंत राहण्यासाठी लेखणी देखणी नव्हे तर आखणीयुक्त असावी लागते.
लेखणीस कोणी रंग आणि टोप्यांच्या, धर्माच्या, कर्माच्या, जातीच्या झुली घातल्या तर खून हा वध होतो आणि मग गोडसेदेखील महात्मा बनू शकतो, सहसा आपली नजर  दृष्टी झाली तरच दिसते, नुसतेच पाहणे म्हणजे दिसणे नसते. विविध लेखक लिहत असतात, आपण अनेंक वाचनातून एक वचन तयार करावे, ते प्रमाण मानावे. इतिहास समजत असताना, खूप अलवार, अलिप्त राहणे सजगतेचे लक्षण असते. काही शिवकालीन गोष्टी, तथ्य उलगडण्यासाठी, काही ग्रंथ गूजगोष्टी बघू या.

     इतिहासकार म्हणून माहीत असलेला ग्रँड डफ हा एक इंग्रज अधिकारी होता, तो एल्फिन्स्टन यांना सहाय्यक म्हणून काम करत असे. ग्रँड डफ हा कप्तान म्हणून होता. पुण्यात नियुक्ती होती. पुढे बाजीरावानंतर त्याची नियुक्ती साताऱ्याला करण्यात आली. त्याला महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शौर्याचे, पराक्रमाचे अप्रूप वाटत असे. तो तेथे असता त्याच्या मनात आले की, महाराष्ट्र देशचे लोक इतक्या योग्यतेस कसे झाले, चढले? त्यांच्या त्या पराक्रमाचे कारण परदेशातही समजायला पाहिजे, म्हणून त्याने माहिती गोळा करून लेखन सुरू केले. त्याने पहिल्यांदा लेखन केले म्हणून त्याला मराठ्यांचा आद्य इतिहासकार असेही म्हणतात. त्याने लिहिलेले पुस्तक म्हणजे मराठ्यांची बखर लेखक : ग्रँड डफ
ग्रँड डफ याने हे लिखाण करताना अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांचा आधार घेतला आहे. त्याने मंदिरांना दिलेले दान पत्र, सरदारांच्या सनदा, विविध बखरा, इंग्रजांनी लिहिलेली वृत्तान्त, पुरातन लेख, मुसलमानी लेखकांनी लिहिलेल्या बखरा या सर्वांचा आधार घेऊन अभ्यास करून त्याने इंग्रजीमध्ये लिखाण केले. या कामासाठी त्यांनी प्रचंड खर्च केला, वैयक्तिक पगार वापरला. कच्च्या लिखाणाचे कॅप्टन डेव्हिड केपण याने बाबा साने यांच्या मदतीने १८२९ मध्ये हा मराठी अनुवाद मुंबई येथे प्रसिद्ध केला.


    ग्रँड डफ यांचे लेखन अनेक वर्षे प्रमाण मानले गेले. या लेखनावर विश्वास ठेवला गेला... पण नंतरच्या काळात ग्रँड याच्या हेतुवर आणि लिखाणाच्या शैलीवर अनेकांनी आक्षेप घेतले. इंग्रजी श्रेष्ठता हा भाव मनात ठेवून त्यांनी लेखन केले असाही त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. त्याने स्वाभाविकपणे इंग्रजी  लोकांचा गौरव केला आहे. इंग्रज राणी आणि एल्फिन्स्टन याचं उदार वर्णन केलं आहे. घेतलेले आक्षेप बिनबुडाचे नक्कीच नाहीत,अर्थात आजही आपण बरेच लोक शिवाजी महाराज यांनी सुरतेची लूट केली असेच म्हणतो, वास्तविक आपण महाराज यांनी, ‘सुरतेची स्वारीी' केली असेच म्हणायला पाहिजे. ‘लूटी' करतो तो चोरी करतो,असो, असे असले तरीही त्याने घेतलेले कष्ट आणि जमवलेली माहिती वादातीत आहे. हा एक संदर्भ ग्रंथ आहे,जो समकालीन आहे म्हणूनच अभ्यासकांनी मान्यता दिलेला आहे.
या एकाच पुस्तकात तीन भाग आहेत.

१)प्रकरणः१
सन १००० ते १४७८
अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला जिंकला पासून सुरुवात झाली आहे.
२) प्रकरणः२
इसवी सन १४७८ पासून सन १६३७ पर्यंत झालेली वर्तमाने
३) प्रकरणः३
इसवी सन १६३७ पासून सन ....पर्यंत झालेले वर्तमाने, अशी एकूणः३३ प्रकरणे यात आहेत.

     छत्रपती शिवाजी महाराज आणि समकालीन इतिहास समजण्यासाठी अन्य उपलब्ध बखरी  देखील आहेत,जसे
१. सभासद बखर (शिवचरित्राचा आधार मानली गेलेली बखर)
लेखकःकृष्णाजी अनंत सभासद
संपादनःशंकर नारायण जोशी
२. श्रीमंत महाराज भोसले यांची बखर
सातारा दप्तरातील पहिला रुमाल म्हणून याची ओळख आहे.
लेखकः संकलित
संपादनः विनायक लक्ष्मण भावे
३. श्री शिवदिग्विजय (श्री शिवाजी महाराजांची बखर)
मूळ लेखक(उल्लेख नाही)ः संशोधकांच्या मतेः खंडो बल्लाळ
छत्रपती शिवरायांच्या स्वर्गवासानंतर अडतीस वर्षांनी लिहिली गेलेली!
संपादकः पांडुरंग रामचंद्र नंदुरबारकर
 आणि लक्ष्मण काशिनाथ दांडेकर
४. महिकावतीची बखर
मूळ लेखकः.....
संपादनः इतिहासाचार्य वि.का. राजवाडे
५. नागपूरकर भोसल्यांची बखर
लेखकः काशीराव राजेश्वर गुप्ते
संपादनः रा.रा. वामन दाजी ओक
६. भाऊसाहेबांची बखर
संपादकः शं.ना.जोशी
७. हरिवंशाची बखर अथवा पटवर्धन सरदारांच्या हकीकती
लेखकः बाळकृष्णराव हरिहर पटवर्धन
संपादकःवासुदेव वामनशास्त्री खरे
८. पानिपतची बखर
लेखकः  काशिनाथ नारायण साने
९. पेशव्यांची बखर
संपादकः काशिनाथ नारायण साने आणि
१०. मराठ्यांची बखर
लेखकः ग्रँड डफ
मराठी अनुवादः डेव्हिड केपन.

     आपणास हवे ते न घेता, योग्य ते पुरावे, दाखले, संदर्भ असलेले साहित्य घ्यावे, वाचावे आणि महाराज यांना देवत्व न देता मानव राहू द्यावे, जेणेकरून त्यातून जरांगे पाटीलसारखा मावळा घडू शकतो.- प्रा. रविंद्र पाटील, शिवव्याख्याते, कोपरखैरणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

गेले ते दिवस.. उरल्यात फक्त आठवणी