भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास देश पूर्णपणे कर्जात बुडणार -प्रकाश आंबेडकर

नवी मुंबई : गेल्या ७४ वर्षांमध्ये देशातील प्रत्येक नागरिकांवर २४ रुपयांचे कर्ज होते. मात्र, गेल्या १० वर्षात प्रत्येक नागरिकांवरील कर्ज ८४ रुपयांवर गेले आहे. अशा पध्दतीने ‘मोदी सरकार'ने १० वर्षात देशाला कर्जाच्या खाईत लोटले आहे. पुन्हा जर तुम्ही मोदी, आरएसएस आणि भाजपला मत दिले, तर येत्या काळात देश पूर्णपणे कर्जात बुडेल असे भाकीत ‘वंचित बहुजन आघाडी'चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नेरुळ येथे व्यक्त केले. दरम्यान, देशाला कर्जामध्ये बुडवायचे नसेल तर ‘भाजपा'च्या विरोधात मत देण्याचे आवाहन आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडी, नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सत्ता परिवर्तन महासभा ६ मार्च रोजी नेरुळ, सेवटर-१२ येथील रामलीला मैदानात आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात ‘मोदी सरकार'वर सडकून टीका केली. याप्रसंगी विचारमंचावर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवक प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, शरद सरवदे, नवी मुबई जिल्हाध्यक्ष दिलीप बन्दीछोडे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
‘अबकी बार ४०० पार' असा ‘भाजपा'चा प्रचार सुरु आहे. ४०० आणायचे की नाही, ते आपल्या हातात आहे. मतदार जे ठरवणार तेच होणार. त्यामुळे इस बार मोदी सरकार नाही, तर सेक्युलर विचारांचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

गेल्या १० वर्षात देशात जी बेरोजगारी वाढली त्या बेरोजगाराची हमी ‘भाजपा'कडून दिली जात आहे. या सरकारने मनोज जरांगे यांना देखील नवी मुंबईत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनाही या सरकारने फसवणुकीची हमी दिली. गेल्या १० वर्षात संपूर्ण देशभरामध्ये ३५ हजार ठिकाणी ‘ईडी'च्या धाडी टाकण्यात आल्या. मात्र, त्यापैकी किती जणांना कोर्टाने शिक्षा ठोठावली, याची सरकारने माहिती देण्याचे आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ‘भाजपा'ला दिले. तसेच गंगेत स्नान केल्यानंतर ज्याप्रमाणे पाप धुतले जातात, तसे ‘भाजपा'मध्ये गेल्यानंतर चोर साव होत आहेत. त्यामुळे चोऱ्या करा आणि ‘भाजपा'मध्ये या, अशी हमी भ्रष्टाचाऱ्यांना ‘भाजपा'कडून दिली जात असल्याची टिका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मोदी देशापेक्षा ‘गुजरात'चे पंतप्रधान असल्याचे त्यांच्या वर्तणुकीवरुन दिसून येत आहे. देशातील सगळ्या राज्यात ‘ईडीे'च्या धाडी टाकण्यात आल्या. मात्र, गुजरातमध्ये धाडी टाकल्या जात नाहीत. यावरून गुजरात मधले सगळे व्यापारी साव, तर उर्वरित देशातील व्यापारी चोर आहेत, अशा प्रकारची या सरकारची भूमिका असल्याचे दिसून येत आहे. या सरकारने महाराष्ट्रातील अनेक कारखाने गुजरातला पळून नेले. या पुढील काळात पुन्हा ‘भाजपा'ला मत दिल्यास येथील उर्वरित कारखाने गुजरातला पळून नेण्याचे लायसन्स त्यांना तुमच्या मताच्या रुपाने मिळेल. त्यामुळे तुम्ही ‘भाजपा'च्या विरोधात मतदान केले पाहिजे,असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

या वेळची निवडणूक लोकशाही, संविधान आणि उद्याच्या पिढीचे स्वातंत्र्य वाचवण्याची आहे. त्यामुळे पुन्हा भाजपा सत्तेत येणार नाही, याची दक्षता सगळ्यांनी घेण्याचे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि इतर पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खा. राजन विचारे यांच्याकडून विविध कामांची पाहणी