एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारातील सुरक्षा तोकडी; चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मुख्य कांदा-बटाटा बाजार आवारात एपीएमसी प्रशासनाची सुरक्षा अपुरी पडत असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात सीसीटीव्ही सह सुरक्षा रक्षकांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी एपीएमसी कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ, तुर्भे तर्फे एपीएमसी सचिवांकडे करण्यात आली आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी रोज चार हजार वाहनांची आवक-जावक होत असून, २५ हजार पेक्षा जास्त ग्राहकांची वर्दळ असते.मात्र, याच मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील सुरक्षा रामभरोसे सोडण्यात आली आहे. एपीएमसी कांदा-बटाटा आवारात लहान मुले, स्त्रिया, भिकारी लोक कांदा, बटाटा, लसूण, आदी शेतमालाची विक्री-वितरण होत असताना खाली पडलेला शेतमाल गोळा करण्यासाठी येतात. याशिवाय मुख्य एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात भुरट्या चोरांचा उपद्रव देखील वाढू लागला आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजार आवारात मोबाईल, रोख रक्कमेच्या चोरीमध्ये वाढ होवु लागली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मे. पुष्पा ट्रेंडर्स  मालकाचा मोबाईल आणि खरेदीदार श्याम केशवन (अंधेरी) यांची रक्कमेची बॅग गाळा नंबर-ई-११६ येथून चोरी झालेली आहे. त्यामुळे शेतमाल चोरी बरोबरच बाजार आवारातील सर्व प्रकारच्या चोऱ्या  वाढत असल्याने चोऱ्या आटोक्यात आणण्यासाठी एपीएमसी बाजार आवारातील आवक- जावक गेट तसेच प्रत्येक विंग्जमध्ये सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, एपीएमसी बाजार आवारातील सी, ई, एफ, जी आणि एच विभागामध्ये, लिलावगृहात कायमस्वरुपी सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करावेत तसेच  सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यांत यावी, बाजार आवारातील अनोळखी / संशयास्पद व्यक्तींची सुरक्षा रक्षकांमार्फत दैनंदिन तपासणी, चौकशी करण्यात यावी, एपीएमसी पोलिसांनी एपीएमसी कांदा, बटाटा आणि लसूण बाजार आवारातील गस्त वाढवावी, अशी मागणी कांदा-बटाटा आडत व्यापारी संघ, तुर्भे यांच्या द्वारे एपीएमसी सचिवांकडे करण्यात आली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अटल सेतू'च्या जासई येथील जमिनीचे भूसंपादन रद्द