होळी सणासाठी आगरी-कोळी समाजाची वाफेवर बनविल्या जाणाऱ्या पापड्यांची लगबग सुरु

वाशी : आगरी-कोळी समाजाने होळी सण दिवाळी सणासारखा साजरा करण्याची परंपरा पिढ्यानपिढ्या सुरु ठेवली आहे. होळी सणासाठी नानाविविध नैवद्य बनवण्याची परंपरा आगरी-कोळी समाजात आहे. त्यातीलच एक होळीला लागणारा नैवेद्य म्हणजे वाफेवर बनवली जाणारी तांदळाची पापडी अर्थात या पापडीला कुणी फेण्या देखील म्हणतात.

सध्या शहरीकरणामुळे तांदळाच्या पापड्या या वेळेनुसार आणि सवडीनुसार बनवल्या जातात. मात्र, पूर्वी होळी सणाच्या १५ दिवस आधीपासूनच घरोघरी चुलीमधून निघणाऱ्या वाफेवर तांदळाच्या पापड्या बनविण्याची लगबग पाहायला मिळत होती. मात्र, आता तशी लगबग जरी पाहायला मिळत नसली तरी घरोघरी किमान काही तरी किंवा नैवेद्यला लागतील एवढ्या तरी पापड्या बनवल्या जातात. आज नवी मुंबई शहरात चुलीची जागा गॅस शेगडीने घेतल्याने पापडी बनवण्याची कला लोप पावत चालली आहे. त्यामुळे काही लोकांना आज रेडिमेड ‘पापडी'वर विसंबून राहावे लागत आहे.

महाराष्ट्रात ज्या पध्दतीने होळीचा सण साजरा केला जातो अगदी त्याच जोशात आणि पारंपरिक पध्दतीची कास धरुन नवी मुंबईतील आगरी-कोळी समाजात होळी साजरी केली जाते. धुळीवंदनाच्या एक दिवस आधी होळी पेटवली जाते. होळीला ओल्या नारळाची करंजी, पुरणपोळी, वडे आणि तांदळाची पापडी नैवद्य म्हणून दाखवली जाते. मात्र, नवी मुंबई मधील गाव-गावठांणाने कात टाकत असल्याने गावातील चूल आज हद्दपार होत चालली आहे. त्यात सध्या मॉडिफाय किचन मध्ये मातीची चूल हद्दपार झाली आहे. काहींकडे असलेल्या चुली टेरेसवर आहेत. त्यामुळे होळीसाठी लागणाऱ्या तांदळाची पापडी बनवणे दुर्मिळ होत चालले आहे. मात्र, होळी सणाला पापडीचा नैवद्य दाखवणे आगरी-कोळी समाजात क्रमप्राप्त असल्याने काही लोकांना तयार पापडीवर विसंबून राहावे लागत आहे. तयार पापड्या नवी मुंबई शहरात शेजारील उरण तालुक्यातील गावा-गावातून विक्रीसाठी येत असतात. होळी सणात तांदळाच्या पापड्यांना नैवेद्य साठी अधिक मान असतो. तांदळाच्या पापडी शिवाय नैवैद्य अपूर्णच वाटतो .

नवी मुंबई शहर जरी आधुनिक होत चालले असले तरी येथील भूमिपुत्रांनी आपले सण, संस्कृती, कला टिकवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे सणांना जो काही नैवेद्य लागतो तो जर कुणाला बनवता येत नसेल तर आपल्या समाजातील ज्येष्ठ महिलांकडून निसंकोच नैवेद्य  शिकून घेतले जातात. तांदळाची वाफेवर बनवली जाणारी पापडी खर्चिक नसली तरी वेळ आणि कष्ट अधिक लागतात. काही वर्षांपूर्वी होळी सणाच्या तोंडावर घराघरात महिलांची पापड्या बनविण्यासाठी लगभग सुरु असत होती. त्यावेळी पापडी जवळच्या नातेवाईकांसाठी देखील बनवल्या जात होती. आगरी-कोळी समाजातील लग्नात देखील पापड्यांना अधिक मान असतो.कोणी रंगीबेरंगी पापड्या बनवतात तर कोणी पापडीवर होळी मातेचे नाव देखील टाकतात. वाफेवर बनवलेली पापडी वर्ष दीड वर्ष खराब होत नाही. फक्त पापडी हवाबंद डब्ब्यात ठेवावी लागते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 शहीद दिनी महापालिकेतर्फे स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली