रक्ताच्या कर्करोगापासून २१ महिन्यांच्या बाळाला जीवनदान

नवी मुंबई : कर्जत येथील २१ महिन्यांच्या बाळाने बी-सेल ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमियावर (एएलएल) मात केली. एएलएल हा लहान मुलांच्या कर्करोगाचा एक सामान्य प्रकार आहे. गंभीर आजाराचा सामना करत असताना मुलाने रोगावर मात केली आहे. योग्य स्टेम सेल दाता शोधताना सर्वांना आव्हानांचा सामना करावा लागत होता, मात्र बाळाचे वडील हॅप्लोआयडेंटिकल (अस्थिमज्जा) मॅच म्हणून समोर आले. अस्थिमज्जा प्रत्यारोपणामध्ये, जेव्हा पूर्ण जुळणारा (एकसारखा) दाता उपलब्ध नसतो, तेव्हा सर्वसाधारणपणे कुटुंबातील एक सदस्य, ज्याच्या ऊतींचे प्रकार प्राप्तकर्त्याशी ५० % जुळतात, तेव्हा या हाफमॅच दात्याचा बीएमटी साठी विचार केला जातो,  बाळाला कोणतेही भावंडे नव्हती आणि विविध रेजिस्ट्रीजमध्ये जुळणारे दाते उपलब्ध नव्हते अशा परिस्थितीत प्रत्यारोपणाचा निर्णय घेतल्यामुळे छोट्या-रुग्णाला जीवनदान मिळाले.

रुग्णाच्या कुटुंबाला सेवाभावी संस्था, क्राउडफंडिंग आणि टाटा व अपोलो हॉस्पिटल्स ट्रस्टकडून चांगले सहकार्य मिळाले, त्यामुळे जीवनरक्षक प्रत्यारोपण प्रक्रिया परवडणारी ठरली. मुलगा आता ल्युकेमियामुक्त झाला आहे आणि बीएमटी करुन १०० दिवस पूर्ण झाले आहेत. रुग्णाचे वडील भावूकपणे म्हणाले की, आता आमच्या बाळाला, कर्करोगमुक्त आणि बागडताना पाहून, माझे मन कृतज्ञतेने भरून गेले आहे. सेवाभावी संस्थांचे अथक परिश्रम, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून दिसलेली उदारता आणि टाटा व अपोलो हॉस्पिटल्ससारख्या संस्थांच्या मदतीशिवाय हे यश अशक्यप्राय होते. अपोलो कॅन्सर सेंटर, नवी मुंबईचे पेडिऍट्रिक हेमॅटो-ऑन्कोलॉजी सल्लागार डॉ.विपिन खंडेलवाल म्हणाले की मुलांमधील ऍक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (एएलएल) हा एक प्रकारचा कर्करोग आहे, जो रक्त आणि अस्थिमज्जेवर परिणाम करतो. अस्थिमज्जेमधील सामान्य पेशी बाहेर काढणाऱ्या लिम्फोब्लास्ट्‌स नावाच्या अपरिपक्व पांढऱ्या रक्त पेशींच्या जलद प्रसारामुळे हा रोग उद्‌भवतो. यामुळे निरोगी रक्त पेशींच्या उत्पादनावर परिणाम होतो, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा, फिकट त्वचा, वारंवार संक्रमण, आणि सहजरित्या जखम होणे किंवा रक्तस्त्राव होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. प्रत्यारोपण प्रक्रिया केल्यानंतर बाळ आता ल्युकेमियामुक्त झाले आहे आणि बीएमटी झाल्यानंतर आता १०० दिवस पूर्ण झाले आहेत. अपोलो कॅन्सर सेंटर्स, नवी मुंबईचे प्रोग्राम समन्वयक-प्रत्यारोपण चिकित्सक डॉ.पुनित जैन म्हणाले की जेव्हा पूर्ण जुळणारा (एकसारखा) दाता मिळत नाही, तेव्हा हॅप्लोआयडेंटिकल प्रत्यारोपण हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर येतो. या प्रक्रियेमध्ये दात्याला, विशेषतः कुटुंबातील सदस्याला विचारात घेतले जाते. या बाळाला भावंडे नसल्यामुळे त्याच्या वडिलांकडून अस्थिमज्जा प्राप्त केले गेले.

Read Previous

क्लाऊड नाईन रुग्णालयाला महापालिकेची नोटीस

Read Next

धर्मादाय रुग्णालये करत आहेत उच्च न्यायालयाच्या योजेनेचा भंग?