पनवेल महापालिका ॲवशन मोडवर

पनवेल : महापालिकेचा मालमत्ता कर न भरलेल्या पनवेल मधील थकबाकीदारांना जप्तीपूर्व नोटीसा बजावण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांनी चारही प्रभागामध्ये ४८ जप्तीपूर्व नोटीसांचे वाटप केले.

पनवेल महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागामधील सुमारे ३.५० लाख मालमत्तांना कराची आकारणी करण्यात आली आहे. यातील ७७ हजार मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ताकर भरला आहे. उर्वरित २.८० लाख मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला नाही. सध्याच्या आर्थिक वर्षामध्ये १७ एप्रिल २०२३ पासून आजपर्यंत २६१ कोटी इतकी वसुली झाली आहे.

आजवर महापालिकेने सातत्याने नागरिकांना सवलती देऊन मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले आहे. परंतु, आता महापालिकेने थकबाकीदारांच्या विरोधात कठोर पावले उचलण्यास सरुवात केली आहे. ज्या थकबाकीदारांचा खूप जास्त मालमत्ता कर भरावयाचा राहीला अशा सुमारे १०१ औद्योगिक, १०७ अनिवासी, १०० निवासी थकबाकीदारांची यादी वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द केली आहे. सदर मालमत्ताधारकांना जप्ती नोटीसा देण्याचे काम वेगाने सुरू आहे. अखेर २७ फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या चारही प्रभागांमध्ये ४८ जप्तीपूर्व नोटीसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये खारघरमधील ८ अनिवासी थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या. तसेच कामोठे मधील २ औद्योगिक आणि ८ निवासी, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीमध्ये २४ तर  एमआयडीसी भागामध्ये ६ थकबाकीदारांना नोटीसा देण्यात आल्या. सदर थकबाकीदारांना येत्या सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांच्या मार्फत संबंधितांविरोधात वॉरंट काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२८ आणि अनुसूची ड प्रकरण ८ कराधान नियम ४७ अन्वये महापालिकेला देय असलेल्या कराच्या थकबाकीपोटी जंगम स्थावर मालमत्ता जप्त अथवा अटकावणी करुन मालमत्ता जाहिर लिलावाने विक्री करुन थकबाकी वसूल करण्याचे महापालिकेला अधिकार आहेत. मालमत्ताधारकांनी महापालिकेचा थकीत मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेने सातत्याने विविध सवलती दिल्या होत्या. अखेर मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने मालमत्ताधारकांना वसुलीच्या नोटीस दिल्यानंतर आता जप्ती नोटीसा देण्यास सुरुवात केली आहे. यासाठी मालमत्ता कर विभागाच्या जप्ती पथकाच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निवासी, अनिवासी, औद्योगिक थकीत मालमत्ताधारकांना जप्ती नोटीसा पाठविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरावा, असे आवाहन सातत्याने रिक्षामधून लाऊडस्पीकर द्वारे चारही प्रभागांमध्ये केले जात आहे. महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’' मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेच www. panvelmc.org या वेबसाईटवर जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे. मालमत्ताधारकांना काही शंका असल्यास 1800-5320-340  या टोल फ्री क्रमांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

करवाढ नसलेले ‘केडीएमसी'चे अंदाजपत्रक जाहीर