महापालिकातर्फे दोन वर्षांच्या शिष्यवृत्तीचे गतिमानतेने वितरण

गतवर्षासाठी २५,४१९ लाभार्थ्यांना २०.३३ कोटींचे वाटप; ८,३३८ लाभार्थ्यांचे अर्ज पाठविले परत

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागामार्फत महिला-बालकल्याण, मागसवर्गीय घटक, प्रकल्पग्रस्त, महापालिका आस्थापना तसेच कंत्राटी सफाई कामगार, नाका कामगार, युवक कल्याण या घटकांकरिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. समाजातील लाभार्थी घटकांपर्यंत सदर योजनांची माहिती पोहोचावी आणि त्यांना या योजनांचा लाभ घेता यावा याकरिता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजविकास विभागाच्या वतीने विविध माध्यमांचा वापर केला जात आहे.

या योजनांमध्ये विधवा-घटस्फोटित महिलांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, आर्थिक आणि दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता १ ली ते महाविद्यालयीन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण  करणे, इयत्ता पहिली ते महाविद्यालय पर्यंतच्या शिक्षणासाठी गुणवत्ताप्राप्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या आस्थापनेवरील सफाई कामगार आणि कंत्राटी पध्दतीवर असलेल्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील दगडखाण-बांधकाम-रेती-नाका कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करणे अशा विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या योजना विविध राबविण्यात येतात.


सदर योजनांकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या दोन वर्षांकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते. त्याचा लाभार्थी घटकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आलेले होते. यामध्ये प्राप्त अर्जांची छाननी पूर्ण करुन सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्राप्त ३५,५८९ अर्जांपैकी २६,७३९ लाभार्थ्यांना २१ कोटी २८ लक्ष २२ हजार ८०० इतक्या रक्कमेच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आलेले आहे. यामध्ये ९८५ लाभार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले असून ९७९ लाभार्थ्यांचे अर्ज तपासणी प्रक्रियेत आहेत. त्याचप्रमाणे ५८८६ लाभार्थ्यांचे अर्ज परत पाठविण्यात आलेले आहेत.


अशाच प्रकारे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्राप्त ३७,६८६ अर्जांपैकी २५,४१९ लाभार्थ्यांना २० कोटी ३२ लक्ष ८४ हजार २१९ इतक्या रक्कमेच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आलेले आहे. यामध्ये २,००१ लाभार्थ्यांचे अर्ज नाकारण्यात आलेले असून १,९२८ लाभार्थ्यांचे अर्ज तपासणी प्रक्रियेत आहेत. त्याचप्रमाणे ८,३३८ लाभार्थ्यांचे अर्ज परत पाठविण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागाच्या वतीने सन २०२१-२२ आणि सन २०२२-२३ या दोन वर्षांतील शिष्यवृत्ती वितरण प्रक्रिया नियोजनबध्द रितीने कार्यवाही करुन पूर्ण करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थी घटकांनाही लवकरात लवकर शिष्यवृत्ती देण्याच्या दृष्टीने गतीमान कार्यवाही करण्यात येत आहे. -डॉ. श्रीराम पवार, उपायुवत-समाजविकास विभाग, नवी मुंबई महापालिका.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 पर्यावरणशीलता जपत दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविले सीडबॉल