जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत महापालिका शाळेची मैदान गाजविण्यास सुरुवात

नवी मुंबई महापालिका फुटबॉल खेळात स्वतंत्र ओळख निर्माण करेल; मान्यवरांकडून कौतुकाची थाप

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेला शालेय स्तरावरील क्रीडा स्पर्धांकरिता जिल्ह्याचा दर्जा प्राप्त असून नुकतीच नवी मुंबई महापालिका जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात झालेली आहे. यामध्ये महापालिका शाळा क्र.३६ कोपरखैरणे शाळेतील १७ वर्षाखालील मुलींचा फुटबॉल संघ पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. या स्पर्धेमध्ये मागील अनेक वर्षे स्पर्धांमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या कॉन्वेन्ट शाळांचे संघ सहभागी झाले आहेत. यातील जगात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या फुटबॉल खेळामध्ये प्रथमच महापालिका शाळा क्र.३६, कोपरखैरणेचा संघ सहभागी झाला आहे.

सदर आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत मुलींच्या पहिल्याच सामन्यात कोपरखैरणेच्या मुलींच्या संघाने विबग्योर हायस्कूल, ऐरोली या संघावर ४-० असा एकतर्फी मोठ्या फरकाने विजय संपादन करीत आपल्या उत्तम खेळाची चुणूक दाखविली आहे. या सामन्यामध्ये कोपरखैरणे शाळेच्या पूर्वा नवघने हिने २ तर पुजा जाधव आणि किरण सुर्यवंशी यांनी प्रत्येकी १ गोल केले. राबिया शेख हिने या यशात अत्यंत मोलाची साथ दिली.

सामन्यादरम्यान उपस्थित अनुभवी प्रशिक्षकांनी महापालिका शाळेतील विद्यार्थिनी खेळाडुंच्या उत्तम खेळाचे कौतुक करीत आगामी काळात नवी मुंबई महापालिका फुटबॉल सारख्या खेळात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करेल आणि अनेक खेळाडू महापालिका शाळांचा नावलौकिक उंचावताना दिसतील, अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.

यावेळी मैदानावर उपस्थित सर्वच शाळांच्या प्रशिक्षकांनी सामना जिंकल्यानंतर महापालिका शाळेतील मुलींच्या संघांचे अभिनंदन करत त्यांना पुढील सामन्याकरिता शुभेच्छा दिल्या. अशाप्रकारे प्रथमच सीबीएससी बोर्डाच्या खाजगी शाळांसोबत खेळून जिंकल्यानंतर झालेला अनपेक्षित अभिनंदनाचा वर्षाव बघून महापालिका शाळेतील मुली भारावून गेल्या. नवी मुंबई मध्ये फिफा वुमन्स वर्ल्ड कप झाल्यापासून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा फुटबॉल खेळाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला असून आम्ही चांगल्या प्रकारे फुटबॉल खेळू शकतो, असा विश्वास वाढताना दिसून येत असल्याची माहिती महापालिकेचे क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांनी दिली आहे. शाळा क्र.३६ कोपरखैरणेचा  संघ तयार करण्यात शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत गाडेकरआणि क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर घुगे यांनी विशेष मेहनत घेतली असून त्यांना शिक्षिका सौ. वर्षा शिंदे आणि सौ.अश्विनी सावले यांचे सहकार्य लाभले आहे.

 

Read Previous

लीग सामन्यांव्दारे पालिका शाळांतील फुटबॉल खेळाडू विद्यार्थिनींना क्रीडा प्रदर्शनाची संधी

Read Next

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा 2023 -24