जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उदंड सहभाग
महापालिका द्वारे एपीएमसी सचिवांना नोटीस
धोकादायक एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट रिकामे करण्याचे निर्देश
वाशी : दोन दिवसांपूर्वी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजार आवारातील एफ विंग मध्ये इमारतीचा सज्जा कोसळला. या दुर्घटनेची दखल घेऊन नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी थेट एपीएमसी सचिवांना नोटीस पाठवून कांदा-बटाटा मार्केट रिकामे करण्याचे निर्देश दिले. महापालिका अधिकारी २० जुलै रोजी कांदा-बटाटा बाजार आवारातील धोकादायक गाळे रिकामे करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घेऊन पोहोचले. मात्र, कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी प्रखर विरोध केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात २०० पेक्षा अधिक घाऊक व्यापारी व्यवसाय करतात. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी रात्री आठच्या सुमारास इमारतीचा सज्जा कोसळला. बाजार बंद झाल्यानंतर सदर दुर्घटना घडल्याने कोणतीही हानी झाली नसली तरी कांदा-बटाटा मार्केट अती धोकादायक श्रेणी मध्ये येते. व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वादात कांदा-बटाटा बाजार आवाराचा पुनर्विकास रखडल्याने व्यापारी जीव मुठीत धरुन व्यवसाय करत आहेत. मात्र, पुन्हा कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका अधिकारी पोलिसांचा फौजफाटा घेऊन गाळे रिकामे करण्यासाठी गेले असता व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केला. परंतु, महापालिका अधिकारी कारवाई करण्यावर ठाम होते. अखेर एपीएमसी सचिव राजेंद्र भुसारे यांच्याकडे व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ चर्चेसाठी रवाना झाले. तोपर्यंत कारवाई थांबवण्यात आली. अचानक गाळे रिकामे केले तर मोठ्या प्रमाणात असलेला कांदा- बटाटे घेऊन जाणार कुठे?, तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरातील सर्व पुरवठा बंद होईल, अशीही भूमिका व्यापाऱ्यांनी मांडली आहे.
दरम्यान, २००४ सालापासून एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांना बाजाराचा पुनर्विकास रखडला असल्याने वारंवार नोटीस दिल्या जात आहेत, अशी नवी मुंबई महापालिका तुर्भे विभाग सहाय्यक आयुक्त भरत धांडे यांनी दिली.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीवर मुंबई आणि उपनगरातील जीवनावश्यक वस्तू वितरणाची साखळी अवलंबून आहे. अचानक गाळे रिकामे करुन कांदा-बटाटा व्यवसाय बंद केला तर त्याचा वितरण व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील दुकाने खाली करण्याअगोदर प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. - दिगंबर राऊत, कांदा-बटाटा व्यापारी - एपीएमसी.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा बाजार आवारातील इमारती धोकादायक असल्याने महापालिकेने नोटीस बजावल्या आहेत. न्यायालयाने व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तर एपीएमसी संचालक मंडळ बैठक होत नसल्याने या बाबतीत एपीएमसी प्रशासनाला धोरणात्मक निर्णय घ्ोता येत नाही. - प्रकाश अष्टेकर, उप सचिव - एपीएमसी.