मुशाफिरी : फळांचे दिवस !

फळांचे दिवस !

   वर्षाच्या बारा महिन्यांपैकी सर्वात उष्ण समजल्या जाणाऱ्या मे महिन्याला नुकताच सुरुवात झाली आहे. तसा एप्रिलही काही कमी नसतो हे आपण नुकताच १६ एप्रिलला खारघरच्या ‘महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यात भर उन्हात तासन्‌ तास बसवल्याने बळी गेलेल्या व चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या निष्पाप श्रीसदस्यांच्या उदाहरणावरुन पाहिले आहेच! ऑवटोबरच्या कडक उष्म्याला सुध्दा ‘ऑक्टोबर हिट' असे गरमागरम नामाभिधान आहे. पण तरीही मे तो मेच! मे महिन्याच्या कडकपणाची कशाशीही तुलना होणे नाही. मे महिन्याच्या आधीच्या व नंतरच्या महिन्याचे नाते तसे फळांशीही जोडले गेले आहे.

  मे महिना आणि लग्नसराई यांचे जे अतूट नाते आहे ते बहुधा हा काळ शाळा-महाविद्यालयांच्या सुट्यांचा काळ असल्याने जोडले गेले असावे. अंगावर नवनवीन भारी भारी वस्त्रे, सभागृहात लग्नसोहळा असेल तर प्रखर विद्युतझोत आणि बाहेर नुसत्याच मंडपात लग्न असेल तर गरमागरम वाऱ्याच्या झळा अंगावर घेत विवाह सोहळे साजरे करण्याचा हा सारा काळ! मे महिन्याच्या आधीच्या व नंतरच्या महिन्याचे नाते तसे फळांशीही जोडले गेले आहे. कोणतेच फळ आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे तसे कठीणच. सध्याचा मौसम हा प्रान्तोप्रान्तीच्या आंब्यांचा आहे. आमच्या वाशीच्या ए.पी.एम.सी मार्केट मध्ये ‘हापूस' या नावाने बऱ्याचदा देवगडचा हापूस असल्याचे सांगून कसा कर्नाटक किंवा गुजरात राज्यातील आंबा खवय्यांच्या तोंडावर मारला जातो याच्या सुरस बातम्या लोकांनी वर्तमानपत्रांतून वाचल्या असतीलच! हे आंबे कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी घातक रसायनांमधून कसे बुडवून काढले जातात, त्यावर विषारी रसायने कशी फवारली जातात ह्याचेही वृत्त जागरुक प्रसारमाध्यमांनी वाचकांपर्यंत सचित्र पोहचवण्याचे काम केले आहे. या सगळ्यातून वाट काढत आपली फळांची हौस भागवायची मोठी कसरत करण्याचा कठीण काळ आला आहे.

आंबा हा आंबा असतो

उत्कट चवीचा तो थांबा असतो

तो देवगड की रत्नागिरीचा ह्यात नका पडू

आंबा आस्वादणे हा महोत्सव ‘चंगा' असतो

एवढे लक्षात ठेवले की कोणत्याही प्रकारच्या आंब्यांचा रसरसून आस्वाद घेता येईल. चुप्या, काप्या, शेरेवाला, बिन शेऱ्यांचा, गोलाकार, उभट, लांबट, चपटा, पावसाळ्यातही मिळणारा, दशेरी, लंगडा, रायवळ, केसर, गावरान, खोबऱ्या, चंद्रमा, नागीण, निलम, पायरी, बैगनपल्ली, भागमभाग, मल्लिका, मालगीज, रत्ना, राजापुरी, तोतापुरी, वनराज, शेंदऱ्या, शेपू, साखरगोटी, सिंधू, हूर, बदाम, मानकुराद हे आणि याहुनही अधिक प्रकार या आंब्याचे आहेत हे ऐकून चाट पडायला होते. हे सारे प्रकार माझ्या तोंडाला लागणार तरी कधी ? हे एवढे सारे आंबे आणि इतके कमी आयुष्य ? या विचाराने मला अस्वस्थ व्हायला होते. खूप चांगले पोषणमूल्य असलेले हे फळ उगाच नाही ‘फळांचा राजा' या उपाधीला जाऊन पोहचले!  

   या आंब्यांचा रस करावा..की ते कापून, फोडी करुन खावे यावर वाद घालणारे व उपदेशामृत पाजणारे अनेकजण आहेत. (त्या उपदेशामृतापेक्षा मला सरळ आमरसच पाजा की.. असा डायलॉग कधी कधी माझ्या तोंडावर येतो..) मला वाटते... जसे आईस्क्रीम हे बसून खा, उभे राहून खा, आडवे होऊन खा, गाडीत-प्रवासात खा..त्याची चव बदलत नाही..अंतिमतः ते तुम्हाला उच्च प्रतीचा खाद्यानंदच देते..तसेच आंब्याचे आहे. रस किंवा फोडी याने काही फरक पडत नाही. (फवत ते माझ्या समोर लगेच ठेवा!) माझ्या भावाची मुलगी या आंब्यांची प्रचंड मोठी फॅन आहे. आंबे खाताना तिची ब्रह्मानंदी लागलेली टाळी पाहणे व तिच्या चेहऱ्यावर तो सेवनानंद निरखणे हाही मोठा आनंद असतो.

   माझे स्वतःचे एखाद दुसऱ्या फोडीने किंवा रस असेल तर एखाद्या वाटीने कधीही समाधान होत नाही. आंबा हा विकत आणून खावा का? कसाही खा, विकत आणून खा, भेट म्हणून दिलेला खा, शेजारच्यांनी रस बनवून दिलेला प्या किंवा  लग्नसमारंभात कॅटररने आंब्याच्या रसात पपईचा लगदा घालून दिलेला असला तरी तोही वाटीवाटीने प्या..पण आंब्याचा आस्वाद घ्याच. माझ्या लहानपणी गावातील झाडावर लागलेल्या कैऱ्या सुध्दा चोरुन दगड मारुन पाडल्यावर त्या झाडमालकाच्या घरच्यांनी दिलेल्या टोपलीभर शिव्यांसकट कैऱ्या खातानाही त्या मूळ आंब्यापेक्षा अधिक गोड लागत असत असा माझा व माझ्या लहानपणी हे दगड मारायला माझ्यासोबत जे जे बालमित्र असत त्यांचा अनुभव आहे. आता आम्ही थेट देवगडवरुन सहा डझन आंब्याची पेटी घरी मागवण्याच्या आर्थिक क्षमतेचे झालेलो असलो तरी ‘त्या' कैऱ्यांची चव लय भारीच होती असेही संवाद आमच्यात होत असतात.

   जांभळे ही सुध्दा उन्हाळ्याच्या दिवसात उपलब्ध होतात. काळी-निळी, टपोरी, काही हाडाळ तर काही मांसल जांभळे ही केवळ फळेच नाहीत तर वनस्पतीशास्त्राने मान्यता दिलेले औषधही आहे. त्यांच्या बियांपासूनही अनेक दुखण्यांवर इलाज असणारी औषधे तयार केली जातात. एखादी काठी, एखादी चप्पल, दगड भिरकावून झाडावरील जांभळे पाडणे व मग ती खालच्या धुळीत पडल्यावर वेचणे आणि त्यावर फुक मारुन (जणू काही ‘स्टेरीलाइज्ड'च केलीत असे दाखवत) लगेच तोंडात टाकणे हा एक साक्षात अनुभव आहे व तो मी वेळोवेळी घेतला आहे. आताही वयाच्या साठीत आम्ही पन्नास वर्षांपूर्वीचे शाळकरी मित्रमैत्रीणी जमतो.. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुवयातील कर्नाळा खिंडीजवळ असणाऱ्या व वनराजीत लपलेल्या कल्हे या आमच्या नितीन सावंत या मित्राच्या गावी जातो आणि त्याच्या घराजवळ असलेल्या झाडावरची जांभळे पूर्वीइतक्याच मस्तीखोरपणे पाडून त्या झाडाखालीच त्यांचा आस्वाद घेतो, त्या मजेचे वर्णन करण्यात माझी लेखणी तोकडी पडते. या काळ्या निळ्या जांभळांप्रमाणेच पांढरे, फिकट पिवळे जाम हे या उन्हाळ्यात सहज उपलब्ध होणारे पाणीदार फळ आहे. काही जाम हे लालसर, फिकट जांभळट-गुलाबी रंगाचेही असतात. पण गोडी तीच. कडक उष्म्यात शरीरातले जलतत्व कमी होत जाते, डी हायड्रेशन होते..पिऊन पिऊन पाणी तरी किती पिणार? अशावेळी या फळांची योजना आपल्यासाठी निसर्गाने करुन ठेवली आहे. जंगली रानमेवा हेही या त्रतूचे वैशिष्ट्य. आतमध्ये काळी बी आणि वरुन पिवळीजर्द असणारी रांजणे, पांढरी तोरणे, हाटुरणे, करवंदे, काजूफळे, रामफळे, ताडगोळे हे सगळे या हंगामात मोठ्या प्रमाणावर पहायला मिळते. सिताफळाइतका नावलौकिक रामफळाचा का झाला नाही हा प्रश्न मला अनेकदा सतावतो. कदाचित हे फळ महाग विकले जात असल्याने ते जनसामान्यांपर्यंत पोहचत नसावे अशी माझी मीच समजूत घालून घेतो. करवंदांच्या वाट्याला मी फारसे जात नाही, कारण त्यातील बियांचे भांडार. त्यापेक्षा पिवळी रांजणे अनेकपट चांगली. पांढुरक्या तोरणांचीही चव अशीच भारी! माझ्या समोर कुणी पंचपववान्ने वाढली आणि बाजूला तोरणे, पिवळी रांजणे, ताडगोळ्यांनी भरलेले ताट ठेवले तर मी पंचपववानाचे ताट सहज बाजूला सारीन आणि या फळफळावळीवर आधी ताव मारीन!..आणि...

   . .....आणि थोड्या वेळाने, यथावकाश पंचपक्वांनांचे ताट जवळ घेऊन त्याचाही फडशा पाडीन! एकूण काय, आपली ‘प्रायोरिटी' कशाला आहे हे आधी दिसले पाहिजे!

  शाकाहारी पंचपक्वान्ने आस्वादताना त्यातील काही ताटाबाहेर काढून टाकावे लागत नाही. मासे, मटण, चिंबोरी, चिकन खाताना आपल्या ताटाशेजारी जैविक कचरा (आपले ते 'बायो वेस्ट' हो!) आपोआप साचतो. गेली काही वर्षे मानवी जीवन सुकर, सुगम करणारे एकाहुन एक असे शोध लावून एकूणच भारतातील व जगातील संशोधकांनी लोकांचे जगणे अधिकतर आनंददायी करण्यात मोठा हातभार लावला आहे. एकेकाळी द्राक्षांमध्ये बिया असत. पण देशोदेशीच्या संशोधकांनी संशोधन करुन सिडलेस (बिनबियांच्या) द्राक्षांचा शोध लावला व ती लोकप्रिय झाली. देशोदेशीचे राहू दे..दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठातील विविध संशोधकांना माझी विनंती आहे...द्राक्षातील बिया घालवण्याचे तंत्र जसे विकसित केले व बिनबियांची द्राक्षे सर्रास उपलब्ध होऊ लागली..तसे आंब्यातून बाठा नसेल असे आंबे, जांभळात बी नसेल तशी जांभळे, सिताफळ-रामफळात बिया नसतील तशी ती फळे, तोरणे, रांजणे, हाटुरणे हा रानमेवा बिनबियांचा कसा होईल यासाठी आणखी संशोधन करुन तशा फळांच्या प्रजाती विकसित करा की! बघा या भारतीय, कोकणच्या मेव्याला कशी आंतरराष्ट्रीय बाजारात कशी मोठी मुसंडी मारता येईल ती! तेवढेही कठीण वाटत असेल तर काजूच्या फळाचे बी जसे काजूच्या बाहेर असते...तसे तरी करा. फळाबाहेर बी असेल असे शोध लावा. तेवढेही चालेल आम्हाला.  

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतातील शिल्पधन : एकंबरेश्वर मंदिर कांचीपुरम