मुशाफिरी : मृत्युचाच ‘सोहळा' होताना..!

मृत्युचाच ‘सोहळा' होताना..!

ज्या रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुवयातील रेवदंडा येथे धर्माधिकारी परिवाराचे प्रदीर्घ काळ वास्तव्य आहे आणि रायगड जिल्ह्यात त्यांच्या कार्याला मानणारे सर्वाधिक श्री सदस्य आहेत, ज्या पनवेल बस स्थानकासमोरील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाला महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे नाव देण्यात आले आहे, त्याच पनवेलच्या खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा गर्दीजमाऊ सोहळा पार पाडण्यात आला..आणि त्याच पनवेलमध्ये असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात या सोहळ्याप्रसंगी उष्मा आणि नंतरची चेंगराचेंगरी यात बळी गेलेल्या चौदा श्री सदस्यांचे शव विच्छेदन करण्यात आले, त्या उपजिल्हा रुग्णालयालाही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचेच नाव दिलेले असावे हा मोठा विचित्र योगायोग म्हटला पाहिजे.

दहा लाख, वीस लाख, पंचवीस लाख अशा गर्दीचे आकडे गेले काही दिवस महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने झालेल्या या खारघरच्या महाराष्ट्र भूषण शासकीय सोहळ्याच्या निमित्ताने अनेकजण सांगत आहेत. गर्दी जमवणे, आपले प्रभावक्षेत्र किती आहे ते भासवणे, प्रतिस्पर्ध्यांचे डोळे  दिपून जातील असा भपकेबाजपणा करणे, आपल्या कामाचे प्रदर्शन मांडणे, शवतीप्रदर्शन करणे हे राजकारण्यांचे काम आहे; अध्यात्मिक, धार्मिक, विधायक, सकारात्मक, प्रबोधनात्मक कार्यात व्यस्त असलेल्यांनी राजकारण्यांच्या अशा डावाला बळी पडता कामा नये. आपली लोकमान्यता इतरांना इतक्या  घातक प्रकारे एन्कॅश करु दऊ नये. ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति'... ‘योगी पावन मनाचा अपराध साही जनांचा' असेे म्हटले जाते. इतरांच्या भल्यासाठी स्वतःचा देह कष्टविणाऱ्या संतांची, योग्यांची महाराष्ट्र ही पावन भूमी आहे. खारघरमध्ये मात्र जे घडले ते या साऱ्यावर काट मारणारे आहे. पंख्याखाली बसून, हवेची झुळूक अंगावर घेत मंत्र्यासंत्र्यांच्या साक्षीने परमार्थाच्या गोष्टी सांगणे, लोकांना ज्ञानामृत पाजणे, सन्मान स्विकारणे खूप सोप्पे; आपल्या अनुयायांच्या वयाची, त्रासाची, व्याधींची, प्रवासाची, दगदगीची, भक्तीची, आपल्यावरील प्रेमाची कसलीही संवेदनशीलता न बाळगता भर दुपारच्या व ३७ अंशाहुन अधिक तापमानाच्या वेळेसाठी या सत्कार सोहळ्याला होकार देणे केव्हाही गैरच! बरे..हे पहिल्यांदाच घडतेय का? या स्वारी मंडळींना याची माहिती नव्हती का? ५ मार्च २०२३ रोजी जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाल विद्यापीठाची डी लिट पदवी सचिन धर्माधिकारी यांना आमच्या वाशीमधील सिडको प्रदर्शनी सभागृहात देण्यात आली, तेंव्हाही अशी अनावर गर्दी जमली होती. नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर महाआरोग्य शिबीर घेण्यात आले होते. त्याहीवेळी प्रचंड गर्दी होऊन नवी मुंबईतील वाहतुकीचे पार तीन तेरा वाजले होते. त्या शिबीराची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. १ मार्च २००२ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख आणि उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या उपस्थितीत डॉ. नानासाहेबांना समाजभूषण पुरस्कार दिला होता, तेंव्हाही अशीच अलोट गर्दी उसळली होती. पण त्या कार्यक्रमांच्या वेळा संध्याकाळच्या होत्या किंवा कार्यक्रम आच्छादलेल्या सभागृहात होते, त्यामुळे सारे निभावून गेले. खारघरच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची दुपार सोडुन दुसरी वेळ मिळत नव्हती तर अन्य कुणा ज्येष्ठ मंत्र्याला बोलावता आले असते; त्यासाठी एवढ्या लोकांना वेठीला धरण्याचे काहीच कारण नव्हते, पण तसे केले गेले.

   लोकांची दारु सोडवणे, त्यांच्यावर मूल्यांचे संस्कार करणे, त्यांना व्यसनांपासून परावृत्त करणे, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, रवतदान-आरोग्य शिबीरे आयोजित करणे इ. कामे धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून नियमित केली जात असल्याचे श्री सदस्यांकडून सांगण्यात येत असेल तर मग त्याच लोकांना पाच सहा तास भर दुपारी कडाक्याच्या उन्हात बसायला लावून, कार्यक्रमानंतर बाहेर पडताना चेंगराचेंगरी होणार हे  पक्के असताना त्यांच्या आरोग्याशी खेळ होईल याची कल्पना आप्पास्वारींना सरकारने दिलेली दुपारची वेळ नवकी करताना कशी आली नाही, हा प्रश्न पडतो. मागे असाच एक कार्यक्रम खोपोली येथे आयोजित करण्यात आला होता व त्याचीही वेळ अशीच दुपारची होती. हजारो श्री सदस्य पोराबाळांसह, वयोवृध्द आप्तेष्टांसह तेथे बिन आच्छादनाच्या जागेत घामाघूम होत बसले होते. आणि स्वारीसाठी चांगला आच्छादलेला मंडप, पंखे अशा सोयी होत्या. ते पाहुन वैतागलेल्या अनेक तरुण श्री सदस्यांनी त्यानंतर बैठकांना जाणे थांबवले अशी माहिती आहे. समाजमाध्यमांवर रेश्मा ठोसर या भगिनीची याबद्दल फिरत असलेली पोस्ट व त्याला दुजोरा देणाऱ्या अनेकांच्या पोस्ट्‌स पुरेशा बोलक्या आहेत. त्यात उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे स्वारी मंडळींनी देण्याची नैतिकता दाखवली पाहिजे. राजकारणी हे नेहमीच तरबेज, धुर्त, चाणाक्ष, चतुर असतात, असायचेच! त्यांना सत्ता मिळवायची आहे, मिळालेली टिकवायची आहे. पण समाजकारणी, अध्यात्मिक असल्याचा दावा करणाऱ्यांनी त्यांच्या डावपेचांना कितपत बळी पडायचे? खारघरची कार्यक्रमाची ही जागा अनेक अर्थाने लक्षवेधी आहे. एकतर तिथे मोठ्यात मोठी सभा, कार्यक्रम घेण्यासाठी, वाहने पार्क करण्यासाठी मुबलक जागा आहे. पनवेल तालुक्यात येणारे खारघर हे पनवेल, बेलापूर, ऐरोली, पेण, उरण, अलिबाग या पाच विधानसभा मतदारसंघांना भौगोलिकदृष्ट्या जवळ आहे आणि रायगड व मावळ या दोन लोकसभा मतदारसंघाशीही संबंधित आहे. शिवाय बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर या महानगरपालिका हद्दीतील लोकांनाही ये-जा करण्यासाठी सोयीचे आहे. मेगा हायवेेने तेथून दिड तासांत पुण्यातून तेथे येणे शक्य आहे. त्यामुळे कुणीही सत्ताकारणी अशी संधी सोडणार नाहीच! ज्यांचा सत्कार आहे, त्यांनी अशा वेळेसाठी होकार द्यावाच का, हा बडा सवाल आहे.

   मागे हाच महाराष्ट्र भूषण पुरस्कार बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना जाहिर झाला. मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस. पण पुरंदरे यांच्या अनेक वादग्रस्त बाबींवर बहुजन समाजाच्या व शिवप्रेमींच्या मनात तीव्र संतापाची भावना होती. हा पुरस्कार सोहळा उधळून लावण्याचे इशारे दिले गेले. त्यामुळे फडणवीसांनी राजभवनात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बाहेरुन प्रचंड पोलीसी फौजफाटा लावून सत्कार उरकून घेतला. आप्पा स्वारींनी खरेतर योजकता व समयसूचकता दाखवत स्वतःहुन तसा प्रस्ताव शिंदे-फडणवीसांना देऊन बंदिस्त सभागृहात कार्यक्रम घ्यायची सूचना करायला हवी होती. भारतरत्न सारखा देशाचा सर्वोच्च सन्मानही कधी अशी गर्दी जमवून खुल्या जागी दिला जात नसतो. खरेतर आता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात उष्मा प्रचंड वाढतोय. नवी मुंबई महानगरपालिकेने उष्माघाताच्या नियंत्रणासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. शासनही ‘गरज असल्यासच दुपारच्या वेळी घराबाहेर पडा' अशा सूचना देतेय. कदाचित येत्या काही दिवसात मास्क सक्तीही लादली जाईल. हे सारे स्वारींच्या वाचनात आले नसेल का? प्रतिदिन करोना रुग्ण वाढत चालले आहेत. केवळ नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत दिवसाला सरासरी दोन हजार करोना चाचण्या केल्या जाताहेत, रोज ३० ते ४० करोनाबाधित रुग्ण एवढ्याशा नवी मुंबईत सापडताहेत. त्यांना पाच दिवसांच्या विलगीकरणासाठी सांगितले जात आहे.  मग महाराष्ट्र राज्यांत त्याचे प्रमाण किती असेल? आणि तरीही वीस लाख लोक खारघरच्या मैदानावर जमतील अशी खात्री आयोजकांसह आप्पा स्वारींना असूनही हा सारा घाट का बरे घातला गेला? ३० मार्च २०२० च्या सुमारास दिल्लीच्या निजामुद्दीन भागात मुसलमानांच्या तबलिगी जमातने शिक्षण संस्थान देवबंदचा एक कार्यक्रम केला होता. ती करोना रोगप्रसाराच्या सुरुवातीची वेळ होती. तर प्रसारमाध्यमांनी, नागरिकांनी तबलिगींवर टीकेची कोण झोड उठवली होती. देशभरातील विविध शहरांतील मुस्लिम अनुयायी मग तो रोगप्रसार घेऊन आपापल्या गावी गेले अशाही प्रकारचे आरोप झाले होते. आता या वीस लाखाच्या गर्दीत कुणी करोनाबाधित आलेच नसतील का? या गर्दीमुळे करोनाचे महाराष्ट्रातील प्रमाण वाढले तर त्याला जबाबदार कोण? ब्रह्मज्ञान, भविष्यातील संकटांबद्दल समजते, ते निवारण्याचे उपाय करता येतात, संकटे टाळता येतात, समाज जागृत करता येतो, समाजाला विधायक मार्गावर नेता येते, लोककल्याण साधता येते वगैरे वगैरे साठी  बहुजन समाजाने विभूतीपदाला पोहचवून ठेवलेल्यांकडून नक्कीच हे अपेक्षित नव्हते. पण त्यांना तरी का दोष द्या? ते सांगत होते कार्यक्रमाला येऊ नका म्हणून! तरीही भोळे भाबडे लोक स्वारींच्या दर्शनासाठी खारघरला उन्हातान्हात पोहचले आणि एवढ्या प्रचंड पटांगणावर अनेकांना ठिपक्याएवढेही स्वारींचे दर्शन झाले नाही. उष्माघात, चेंगराचेंगरी मात्र झाली. आणि यात बिचारे चौदा जण थेट देवाघरी गेले. काही जण अजूनही मृत्युशी झुंजत आहेत. लोक हो, आता तरी शहाणे व्हा! मरणारे कोण आहेत, कसलीच कुरबुर, तक्रार न करता प्रियजनांचे मृतदेह स्विकारणारे कोण आहेत, मृत्युपंथावर कोण आहेत आणि या क्लेषदायक घटनेबद्दल खेद व्यक्त करुन मृतांच्या आप्तेष्टांना कसलीही मदत न करता  पत्रक काढून मुकाट बसणारे कोण आहेत ते नीट समजून घ्या.

   कसलाही दोष नसताना जीव गमावलेल्या तुळशीराम वागड, जयश्री जगन्नाथ पाटील, महेश नारायण गायकर, कलावती वायचळ, मंजुषा भोंबड, भीमा साळवी, सविता पवार, स्वप्नील केणी, पुष्पा गायकर, वंदना जगन्नाथ पाटील, मीनाक्षी मोहन मिस्त्री, गुलाब बबन पाटील, विनायक हळदणकर आणि स्वाती राहुल वैद्य यांना भावपूर्ण श्रध्दांजली!! 

-  राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी : फळांचे दिवस !