मुख्य लेखा-वित्त अधिकारी धनराज गरड यांना महापालिका तर्फे शुभेच्छा

नवी मुंबई: महाराष्ट्र शासन लेखा-कोषागरे विभागाच्या सहसंचालक पदावरुन संचालक पदावर बढती झाल्याने नवी मुंबई महारपालिका मुख्य लेखा-वित्त अधिकारी पदावरुन ‘सिडको'मध्ये मुख्य लेखा अधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या  धनराज गरड यांना नवी मुंबई महापालिकेच्या वतीने नव्या पदावरील कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात लेखा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शुभेच्छा समारंभाप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार, डॉ. बाबासाहेब राजळे, सोमनाथ पोटरे, मंगला माळवे, अनंत जाधव, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर आणि इतर अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑगस्ट २०१५ मध्ये महापालिका मुख्य लेखा-वित्त अधिकारी पदी शासनामार्फत नियुक्त झालेल्या धनराज गरड यांनी उपसंचालक पदावर साधारणतः ३.५ वर्षे आणि सहसंचालक पदावर ३.५ वर्षे अशा दोन्ही संवर्गात मिळून सव्वा सात वर्षे काम केले असून आता संचालक पदावर बढती झाल्याने त्यांची नियुक्ती ‘सिडको'च्या मुख्य लेखा अधिकारी पदी झालेली आहे. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विविध उल्लेखनीय कामांचा तसेच सर्वांना सामावून घेऊन काम करणाऱ्या मनमिळावू स्वभाव आणि कार्यपध्दतीचा अनेक अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला.

दरम्यान, मागील ७ वर्षे इंडिया रेटींग ॲण्ड रिसर्च या आर्थिक क्षमतेची तपासणी करणा-या राष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेने नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन ‘डबल ए प्लस क्रेडीट रेटींग' अशी उच्च आर्थिक क्षमता श्रेणी सातत्याने प्रदान केली असून यामध्ये धनराज गरड यांच्या कुशल व्यवस्थापनाचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी कार्यभार स्विकारला त्यावेळी साधारणतः ४६५ कोटी रक्कमेचे कर्ज महापालिकेवर होते. त्याबाबत आयुक्त, स्थायी समिती, महासभा यांच्या मान्यतेने सुयोग्य नियोजन केल्यामुळे आज ‘शून्य कर्ज महापालिका' अशी महापालिकेची ओळख होऊ शकली आहे. अशाच प्रकारे ते रुजू झाले तेव्हा साधारणतः ४७५ कोटी रक्कमेच्या महापालिकेच्या विविध बँकांतील ठेवी आता २५०० कोटीपेक्षा अधिक झालेल्या आहेत. महापालिकेचा अर्थसंकल्पही प्रत्येक वर्षी उंचावलेला दिसून येतो. कंत्राटदार, पुरवठादार यांच्या अदायगी ‘होस्ट टू होस्ट' तंत्रप्रणालीद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागल्याने पेपरलेस, पारदर्शक आणि गतीमान कामकाज झाले आहे. कोणत्याही संस्थेच्या मूल्यमापनासाठी आर्थिक ताळेबंद अर्थात बॅलन्सशीट महत्वाची असून धनराज गरड यांनी २०१०-२०११ पासूनचे प्रलंबित आर्थिक ताळेबंद अद्ययावत करण्याचे काम कुशलतेने करून घेतले आहे. याशिवाय कोव्हीड काळातही त्यांच्या कुशल कार्यपध्दतीचा तसेच अर्थशास्त्राच्या बारकाईने अभ्यासाचा उपयोग झाला असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय काकडे आणि सुजाता ढोले तसेच इतर अधिकारी, कर्मचारीवृंदाने सांगितले. 

Read Previous

पालिका कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक समस्या सोडविण्याची मागणी

Read Next

जोशीमठ सद्यस्थितीः ‘डोंगर नियमन प्राधिकरण' स्थापण्यासाठी मागणी